आर्थिक-अनैतिक मागणीतून खून : तिघा जणांना अटक
प्रतिनिधी /बेळगाव
पार्थनहळ्ळी, ता. अथणी येथील रायगोंडा आप्पाराय तेली (वय 33) या युवकाच्या खुनाचा उलगडा झाला आहे. केवळ दोन दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातून ही घटना घडली आहे.
शुक्रवार दि. 3 जून रोजी सकाळी 7 वाजता रायगोंडाचा मृतदेह पार्थनहळ्ळी येथील आमगोंडा संगाप्पा बळूल यांच्या शेतजमिनीत आढळून आला होता. धारदार हत्याराने गळा चिरून या युवकाचा खून करण्यात आला होता. शरीरावर हल्ल्याच्या खुणा होत्या. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहऱयावर
ऍसिड टाकण्यात आले होते.
केवळ चप्पल, घडय़ाळ व अंगावरील कपडय़ांवरून रायगोंडाच्या वडिलांनी त्याचा मृतदेह ओळखला होता. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, अथणीचे पोलीस उपअधीक्षक गिरीश एस. व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकरगौडा बसनगौडर, उपनिरीक्षक कुमार हाडकार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
उमेश ऊर्फ पिंटू मल्हारराव जाधव, रा. पार्थनहळ्ळी, अभिषेक आप्पासाब शिंदे, रा. हारुगेरी, ता. रायबाग, सतीश ऊर्फ बापू शशिकांत कांबळे मूळचा रा. पार्थनहळ्ळी, सध्या रा. हारुगेरी क्रॉस अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खुनासाठी वापरण्यात आलेली शस्त्रs व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. गुरुवार दि. 2 जून रोजी रात्री 8.20 नंतर रायगोंडा घराबाहेर पडला होता. रात्री त्याचा खून करण्यात आला आहे. खुनाच्या घटनेनंतर केवळ दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. या पथकात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक मलकनगौडा बिरादार, शिवकुमार बिरादार, एम. बी. दोडमनी, ए. ए. इरकर, एम. डी. हिरेमठ, पी. एन. कुरी, बी. वाय. मण्णापूर, पी. बी. पाटील, व्ही. एम. नरगट्टी, एस. एस. बबलेश्वर, आर. सी. हादीमनी, व्ही. वाय. बेळगावी, ए. ए. हारुगेरी, के. बी. शिरगुर व त्यांच्या सहकाऱयांचा समावेश आहे.
अनैतिक मागणीमुळे गमावला जीव
खून झालेल्या रायगोंडा तेलीकडून संशयित आरोपी उमेश ऊर्फ पिंटूने आपली आर्थिक अडचण भागविण्यासाठी 25 हजार रुपये हातउसने घेतले होते. घेतलेली रक्कम वेळेत परत करण्यास त्याला शक्मय झाले नाही. त्यावेळी रायगोंडाने पैसे दिला नाहीस तर रात्री तुझ्या पत्नीला पाठव, अशी अनैतिक मागणी केली. या अमानवी मागणीमुळे भडकलेल्या उमेशने आपल्या सहकाऱयांच्या मदतीने रायगोंडाचा मुडदा पाडला.









