अदानी-मणिपूर-आंबेडकर मुद्यावरून गदारोळ : दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर लक्षवेधी चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
18 व्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवार, 20 डिसेंबर रोजी सूप वाजले. हे सत्र 25 नोव्हेंबरपासून सुरू झाले होते. संपूर्ण अधिवेशन काळात एकूण 20 बैठका झाल्या. यादरम्यान लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सुमारे 105 तास कामकाज चालले. अधिवेशनात लोकसभेमध्ये 54 टक्के, राज्यसभेत 41 टक्के कामकाज झाले.
हिवाळी अधिवेशनासाठी एकूण 16/17 विधेयके सरकारने सूचीबद्ध केली होती. मात्र लोकसभेत केवळ 5 विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी 4 संमत झाली आहेत. लोकसभेत 15 तास 43 मिनिटे संविधानावर चर्चा झाली. यामध्ये 62 सदस्यांनी सहभाग घेतला. राज्यसभेत 17 तासांहून अधिक चर्चा झाली ज्यामध्ये 80 खासदारांनी भाग घेतला.
‘एक देश, एक निवडणूक’ संबंधित 129 वे संविधान (दुरुस्ती) विधेयक सर्वाधिक चर्चेत होते. हे विधेयक पुनरावलोकनासाठी 39 सदस्यीय संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्यात आले आहे. लोकसभेतील 27 आणि राज्यसभेतील 12 खासदारांची समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. या समितीला संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी लोकसभेत अहवाल सादर करावा लागणार आहे.
अधिवेशनाच्या प्रारंभीच्या टप्प्यात अदानी मुद्यावरून गदारोळ झाला. मग विरोधी खासदारांनीही मणिपूर आणि शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात डॉ. आंबेडकर यांच्यासंबंधी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला. 19 डिसेंबरला हे प्रकरण अधिकच भडकले. संसद परिसरात झालेल्या धक्काबुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले. त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर झाला असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गदारोळ न केल्यास देशाचे भले होईल : रिजिजू
हिवाळी अधिवेशनात काम कमी झाल्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी सांगितले. एवढ्या मोठ्या देशात संसद चालवण्यासाठी खूप पैसा खर्च होतो. पण संसदेत कामकाज होत नसताना खूप वाईट वाटते, असे ते म्हणाले. संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालत नसल्याने देशाला सर्वाधिक फटका बसतो. खासदारांनी भविष्यात गदारोळ न केल्यास देशाचे भले होईल, असा दावाही त्यांनी केला. धक्काबुक्कीच्या घटनेवर रिजिजू यांनी नाराजी व्यक्त केली. संसदेच्या प्रांगणात झालेली हाणामारी निंदनीय असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
जखमी खासदारांची प्रकृती स्थिर
संसद भवन परिसरात गुरुवारी झालेल्या धक्काबुक्कीमध्ये जखमी झालेल्या दोन्ही सदस्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली. भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या सध्याच्या प्रकृतीबाबत आरएमएलचे डॉ. अजय शुक्ला यांनी माहिती दिली. दोघांची प्रकृती चांगली आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. सध्या दोघांवर आयसीयूमध्ये उपचार केले जात आहेत. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे. सीटी स्कॅन आणि एमआरआय दोन्ही रिपोर्ट नॉर्मल आहेत, अशी माहिती डॉ. शुक्ला यांनी दिली.









