विकासाकडे दुर्लक्ष : उद्यान गवत, झाडे-झुडपांनी व्यापल्याने अस्वच्छ, सुशोभिकरणाचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी

बेळगाव : कॅन्टोन्मेंट परिसराच्या विकासाबरोबर उद्यानाच्या सुशोभिकरणाचा प्रयत्न कॅन्टोन्मेंट बोर्डने केला होता. तसेच उद्यानाच्या विकासाकरिता लाखोच्या निधीची तरतूद केली होती. मात्र उद्यानांचा विकास करण्यात कॅन्टोन्मेंट बोर्डला अपयश आले आहे. कॅन्न्म परिसरात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील गार्डनची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण उद्यान गवत, झाडे-झुडपांनी व्यापल्याने जनावरांचे कुरण बनले आहे. कॅन्टोन्मेंट व्याप्तीमध्ये अनेक खुल्या जागा आहेत. यापैकी काही खुल्या जागा उद्यानासाठी राखीव आहेत. तसेच काही जागा क्रीडांगणासाठी राखीव आहेत. पण राखीवतेनुसार जागांचा वापर केला जात नाही. कारण पॅन्टोन्मेंटवतीने उद्यानाच्या विकासाकरिता निधीची तरतूद केली होती. मात्र निधीचा वापर करून कोणत्या उद्यानाचा विकास केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या कॅन्टोन्मेंटमधील काही मोजकी उद्याने वगळता अन्य उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्यानामध्ये गवत आणि झाडेझुडपे वाढली असून विद्रुपीकरण झाले आहे. कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील उद्यानात विविध प्रकारची झाडे असल्याने खुपच सुंदर आणि निसर्गरम्य होते. पण विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने उद्यानाची दुरवस्था झाली आहे. सदर उद्यान शांत असल्याने याठिकाणी अभ्यासाकरिता मुलांची गर्दी होत असे. तसेच विविध शाळांच्या सहली आयोजित करण्यात येत होत्या. मात्र याठिकाणी असलेले साहित्य खराब झाले असल्याने उद्यानाला अवकळा प्राप्त झाली आहे. प्रशस्त जागेत निर्माण केल्याने उद्यानात नेहमी गर्दी होत असे. पण सध्या देखभालीअभावी गवत, झाडे, झुडपे वाढल्याने उद्यानाची दुर्दशा झाली आहे. तसेच उद्यानाभोवती असलेले तारेचे कुंपण खराब झाले आहे. सदर उद्यानाचा उपयोग मुलांना खेळण्याऐवजी जनावरे चारण्यासाठी केला जात आहे. खेळाचे साहित्य तसेच बसण्यासाठी खुर्च्या बसविण्यात आल्या होत्या. गवत व झुडपांमुळे पहाटे आणि सायंकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांना फिरण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुर्लक्षित परंतु निसर्गरम्य असलेल्या गार्डनच्या सुशोभिकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणीही होत आहे.









