‘तरुण भारत’च्या बातमीचा इफेक्ट
बेळगाव : गोगटे सर्कल येथील उद्यानाची दुरवस्था झाल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध करताच कॅन्टोन्मेंट प्रशासनाला जाग आली. बुधवारी झालेल्या बोर्ड मिटिंगमध्ये गोगटे सर्कल येथील उद्यानाचे नूतनीकरण करण्यासंदर्भात चर्चा झाली. उद्योजक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून उद्यानाचा विकास केला जाईल, असे सांगण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागातील गोगटे सर्कल येथे कॅन्टोन्मेंटचे उद्यान आहे. परंतु या उद्यानात मागील अनेक वर्षांपासून कोणतेही विकासकाम झालेले नाही. त्यामुळे बेघरांनी याठिकाणी आपला ठिय्या मांडला होता.
अनेक ठिकाणी साचलेला कचरा, दलदल, दुर्गंधी यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यातच बेघरांकडून कपडे, तसेच इतर साहित्य टांगण्यात येत असल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने आठवडाभरापूर्वी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीवकुमार यांनी उद्यानाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्ड मिटिंगमध्ये उद्यानातील गैरसोयींवर चर्चा करण्यात आली. तसेच उद्यानाच्या विकासासाठी कॅन्टोन्मेंटकडे मोठा निधी नसल्याने स्वयंसेवी संस्थांना आवाहन करण्याचे ठरविण्यात आले. सुरुवातीला उद्योजक, तसेच काही स्वयंसेवी संस्थांची भेट घेऊन त्यांच्याकडून निधी उपलब्ध होतो का, हे पाहिले जाणार आहे. अन्यथा एका निधीतून विकास करण्याबाबत चर्चा करण्यात आली.









