राजापूर :
लाखो रूपये खर्च करून राजापूर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारामध्ये उभारण्यात आलेल्या गटविकास अधिकारी, बांधकाम उपअभियंता यांच्यासह कर्मचाऱ्यांची निवासस्थाने सध्या विनावापर पडून आहेत. त्यामुळे या इमारती सध्या शोभेच्या बाहुल्या बनून राहिल्या असून शासनाचा इमारतींवर झालेला लाखो रुपयांचा खर्चही वाया गेल्याची प्रतिक्रिया जनमानसातून व्यक्त होत आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागाचा कारभार पंचायत समितीच्या माध्यमातून पाहिला जात आहे. त्या पंचायत समितीची सद्यस्थितीमध्ये प्रशासकीय इमारत असली तरी सर्व प्रशासकीय दालने एकाच ठिकाणी आणण्यासाठी प्रशस्त व सुसज्ज इमारतीची गेल्या कित्येक वर्षापासून पंचायत समितीला प्रतीक्षा राहिली आहे. अशा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात गटविकास आधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांच्या निवासासाठी इमारत बांधण्यात आली आहे.
त्याच्या बाजूला कर्मचारी निवासस्थाने असे मिळून येथे ८ इमारती आहेत. त्यापैकी तीन इमारती नादुरूस्त असून उर्वरित इमारतींची डागडुजी आणि रंगरंगोटी केल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून देण्यात आली. किरकोळ कामे वगळता या इमारती राहण्यासाठी सुसज्ज असल्याचेही बांधकाम विभागाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.
- लाखोंचा निधी खर्च कशासाठी केला?
या इमारतींच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद सेस आणि पंचायत समिती सेसमधून निधी खर्च करण्यात आला आहे. सुसज्ज असलेल्या या इमारतींमध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निवास करणे अपेक्षित असताना सद्यस्थितीमध्ये या इमारतीमध्ये कोणीही राहत नाही वा तिचा अन्य प्रशासकीय कामासाठी उपयोग होताना दिसत नाही. दुरुस्तीनंतर निवासस्थानांचा निवासासाठी उपयोग केला जात नसेल तर त्याच्या दुरूस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च कशासाठी करण्यात आला? असा सवाल आता सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.








