‘कोजिमाशि’च्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांचे 21 जागांवर निर्विवाद वर्चस्व; आ. आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीचा धुव्वा
कोल्हापूर प्रतिनिधी
‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या चुरशीने झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडीने सर्व 21 जागांवर बाजी मारून आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचा धुव्वा उडवला. सभासदांनी सलग चौथ्या निवडणुकीत दादा लाड यांच्या नेतृत्वाला मान्यता दिल्यामुळे सत्ताधारी आघडीने विजयी चौकार मारला आहे. कमीत कमी 870 तर जास्तीत जास्त 1 हजार 633 मताधिक्य घेऊन सत्ताधारी आघाडीतील सर्व उमेदवारांनी बाजी मारली. ही निवडणूक आमदार आसगावकर व दादा लाड यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. पण सभासदांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱयांना कौल दिल्यामुळे संस्था आपल्याच ताब्यात ठेवण्यामध्ये लाड यशस्वी ठरले आहेत.
अधिक वाचा- कोजिमाशी निकाल अपडेट : दादा लाड यांचे सत्ताधारी स्वाभिमानी पॅनेल आघाडीवर
रमणमळा येथील बहुद्देशीय हॉलमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांच्या मागदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. सुरुवातीस मतपत्रिकांचे विभाजन झाल्यानंतर दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या दोन फेरीतच सत्ताधारी आघाडीने 280 चे मताधिक्य घेतले. त्यानंतर पुढील 7 फेरीमध्ये मताधिक्यात वाढ होत गेली. सर्वसाधारण गटातील 16 उमेदवारांच्या मतमोजणीमध्ये चार हजार मतांची मोजणी झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीतील सर्व उमेदवार 400 ते 700 मतांनी आघाडीवर होते. मताधिक्याचा हा कौल स्पष्ट होताच सत्ताधारी आघाडीच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर जल्लोष करण्यास सुरुवात केली. ‘एकच वादा, लाड दादा’ या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या सत्तारूढ आणि विरोधी आघाडीत चुरशीचा दुरंगी सामना झाला असून 21 जागांसाठी पाच अपक्षांसह 47 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रचारामध्ये दोन्ही आघाडीकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. कोजिमाशिची सभासद संख्या 8526 इतकी आहे. त्यापैकी 8106 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे 95.07 टक्के मतदान झाले होते. आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली होती. आमदार आसगावकर व दादा लाड यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. कोजिमाशीमध्ये गेली 18 वर्षे दादा लाड यांची सत्ता आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडी निवडणूक जिंकून विजयी चौकार मारणार असा ठाम निर्धार लाड यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला होता. दुसरीकडे आमदार आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीने कोजिमाशीमध्ये परिवर्तन घडवायचे हा प्रमुख हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रचार यंत्रणा राबवली. शनिवारी झालेल्या मतदानादिवशी गतपंचवार्षिक निवडणुकीपेक्षा 5 टक्क्यांनी मतदान वाढल्यामुळे सभासद कोणाला कौल देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. पण सत्ताधारी आघाडीने पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य घेऊन बाजी मारली. विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगचे डी.जी बोडके, संजय देसाई, रफीक पटेल यांनी दिलेला भक्कम पाठींबा एक माजी संचालक वगळता अन्य आजी, माजी संचालकांनी दिलेले पाठबळ आणि सभासदांचा विश्वासामुळे सत्ताधारी आघाडीने बाजी मारली असल्याचे मत शिक्षक नेते दादा लाड यांनी व्यक्त केले.
दोन संचालकांची हॅटट्रीक
कोजिमाशिचे विद्यमान चेअरमन बाळ डेळेकर व संचालक राजेंद्र रानमाळे यांनी सलग तिसऱयांदा निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक केली. संचालक अनिल चव्हाण दुसऱयांदा निवडून आले. तर आपल्या पत्नीसह अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले मावळते संचालक संदीप पाटील यांचा पराभव झाला.
सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते
सर्वसाधारण प्रतिनिधी गट- श्रीकांत कदम (4541), प्रकाश कोकाटे (4504), सुभाष खामकर (4634), दत्तात्रय घुगरे (4597), अविनाश चौगले (4560), लक्ष्मण डेळेकर (4505), शरद तावदारे (4322), मदन निकम (4455), श्रीकांत पाटील (4632),दीपक पाटील (4727), मनोहर पाटील (4363), राजेंद्र पाटील (4493), राजेंद्र रानमाळे (4549),सचिन शिंदे (4270), पांडूरंग हळदकर (4047). अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी – अनिल चव्हाण (4691), इतर मागासवर्ग प्रतिनिधी (4835), विमुक्त जाती/भटक्या जमाती प्रतिनिधी – जितेंद्र म्हैशाळे, महिला सभासद प्रतिनिधी – ऋतुजा पाटील (4641), शितल हिरेमठ (4624)
राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीला मिळालेली मते
सर्वसाधारण गट- प्रविण आंबोळे (3177), विनोद उत्तेकर (3012), सहदेव केगाळे (2773), प्रकाश शंकर कोकाटे (2712), अभिजित गायकवाड (2954), श्रीधर गोंधळी (3135), बाळासाहेब चिंदगे (2817), उत्तम तिबिले (3126), पंडित पोवार (2850), बाबासाहेब यशवंत पाटील (3042), युवराज पाटील (2793), संजय बटकडली (2920), संतोष भोसले (2708), विक्रमसिंह मोरे (2929), अमर सदलगे (2670), अर्जुन होनगेकर (2573). इतर मागासप्रवर्ग- यशवंत पाटील (3202), भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग – शिवाजी कोरवी (3254), अनुसूचित जाती प्रवर्ग – पांडूरंग कांबळे (3357), महिला प्रतिनिधी – आक्काताई नलवडे (3200), सीमा सुर्यवंशी (3043).