पुणे / प्रतिनिधी :
टाळ मृदंगाचा ताल…त्या सवे पावलोपावली होणारा विठूनामाचा गजर अन ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष करत पुढे सरकणारा भक्तीचा प्रवाह…अशा आनंद ओसंडून वाहणाऱ्या वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे सोमवारी पुण्यनगरीत आगमन झाले. पुणेकरांनी अत्यंत भक्तिभावात दोन्ही पालख्यांचे स्वागत केले.
तुकोबांची पालखी आकुर्डीहून, तर माउलींची पालखी आळंदीहून सकाळी मार्गस्थ झाली. सकाळच्या न्याहारीमुळे बळ प्राप्त झालेले वारकरी अभंगाच्या तालावर डोलू लागले. पावलागणिक उत्साह वाढत गेला. तुकोबांच्या पालखीने दुपारी दापोडीत विसावा घेतला. त्यानंतर पालखी पुन्हा पंढरीच्या मार्गावर आली. तोवर वाकडेवाडीतील मरिआई गेट चौक ते पाटील इस्टेट (संगमवाडी) चौकापर्यंतचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुललेला.
सायंकाळी पाचच्या सुमारास तुकोबांच्या पालखी सोहळय़ातील नगारा झडला अन् भाविकांचे डोळे एकवटले. साडे पाचच्या सुमारास विविधरंगी फुलांनी सजविलेला चांदीचा रथ दृष्टीपथात येताच भाविकांचा आनंद द्विगुणित झाला. रथातील तुकोबांची पालखी अन् पादुकांवर माथा टेकवत अनेकांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला.
तुकोबांच्या पालखीच्या आगमनानंतर भाविकांच्या नजरा संगमवाडी पुलावर खिळल्या. माउलींचा सोहळा दरवर्षीपेक्षा लवकरच पुलाजवळ आलेला. सहाला नगारा झडला. अश्वांच्या आगमनाने चैतन्य पसरले. त्यानंतर हरिनामाच्या गजरात 6 वाजून वीस मिनिटांच्या सुमारास माउलींचा नितांतसुंदर पालखीरथ अवतरला अन् भाविकांच्या आनंदाने परमोच्च बिंदू गाठला. पुष्पवृष्टीने पालखीचे स्वागत करण्यात आले. माउलींच्या पादुकांवर माथा टेकवण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली.
दोन्ही पालख्यांचा महासंगम होताच वैष्णवांच्या या मेळय़ाला महामेळय़ाचे रूप प्राप्त झाले. वारकऱ्यांचा हा भक्तिप्रवाह संचेती चौक, फर्ग्युसन रस्तामार्गे ज्ञानेश्वर पादुका व तुकाराम पादुका चौकात आला. ग्यानबा-तुकारामचा एकच गजर जाहला. अवघी पुण्यनगरी दुमदुमली. पुणेकरांनी दोन्ही पालख्यांचे जल्लोषात स्वागत केले. माउलींची पालखी रात्री पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामासाठी विसावली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील.