चालू वर्षातील सर्वात चर्चेत असलेली वेबसीरिज ‘गन्स अँड गुलाब्स’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. राज आणि डीके यांच्याकडून दिग्दर्शित या अॅक्शन आणि कॉमेडी धाटणीच्या सीरिजमध्ये राजकुमार राव आणि दुलकर सलमान मुख्य भूमिकेत आहे.

या सीरिजमध्ये सतीश कौशिक यांचीही भूमिका आहे. सीरिजमध्ये दुलकर सलमान, गुलशन देवैया अन् राजकुमार राव हे अत्यंत अनोख्या भूमिका साकारत आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्सवर 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. गन्स अँड गुलाब्स आमच्यासाठी रोमांचक यात्रा राहिली आहे. आमचे पूर्वीचे चित्रपट ‘99’, ‘शोर इन द सिटी’मधील कहाणी मांडण्याची शैली अवलंबित आम्ही यावेळी पसंतीच्या क्षेत्रात परतलो आहोत, असे राज अँड डीके यांच्याकडून सांगण्यात आले. या सीरिजची कहाणी एक काल्पनिक शहर गुलाबगंजची आहे, ज्यात 1990 च्या दशकातील बॉलिवूडची झलक आहे. या शहरात अमली पदार्थांच्या तस्करीपासून अॅक्शन, मर्डर, पॉलिटिक्सचे मिश्रण घडत असल्याचे दाखविण्यात आले आहे. याचबरोबर यात रोमांस देखील दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये तीन शालेय मित्रांच्या निरागसतेसह त्यांच्यातील विश्वासघाताची कहाणी दिसून येणार आहे.









