‘सूर नवा ध्यास नवा’ रिअॅलिटी शोमधून जिंकली मने : हिंडलग्याचा सुपूत्र
बेळगाव : ‘माझी मैना गावाकडं राहिली’ या छक्कडीतून सीमावासियांच्या व्यथा प्रत्येक मराठी मनापर्यंत गायक सागर चंदगडकर याने पोहोचवल्या. ‘सूर नवा ध्यास नवा’ या मराठी रिअॅलिटी शोमधून सागरने अप्रतिम छक्कड सादर करून सीमाभागासह महाराष्ट्रवासियांची मने जिंकली. बेळगावमध्ये आजही मराठीपण जपले जाते, याचे परीक्षकांनी कौतुक केले. हिंडलगा गावचा सुपूत्र सागर चंदगडकर याची कलर्स मराठी चॅनेलवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. शनिवारी त्याने शाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली’ ही छक्कड सादर केली. आपल्या पहाडी आवाजात त्याने सादर केलेल्या या छक्कडीला परीक्षकांनी दाद दिली. परीक्षक व आघाडीचे गायक अवधूत गुप्ते यांनी सागरच्या आवाजाचे कौतुक करत अन्याय, अत्याचार होत असतानाही बेळगावने आपले मराठीपण जपल्याबद्दल मराठी माणसाचे कौतुक केले. ‘कर्नाटक निसर्गसौंदर्याने नटलेले असल्याने ते स्वर्ग समजले जाते तर या स्वर्गाचे बेळगाव हे प्रवेशद्वार आहे. स्वर्ग तुमच्याकडे राहू द्या, स्वर्गाचे दार मात्र आमचे आम्हाला परत द्या’ अशी प्रतिक्रिया देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
शाहीर चंदगडकरांनी गाजवला शो
सीमाभागातील पहाडी आवाजाचा शाहीर म्हणून ओळख असणाऱ्या सागर चंदगडकर याचे वडील शिवाजी चंदगडकर यांनीसुद्धा ‘माझी मैना गावाकडं राहिली …’ गीत याच कार्यक्रमात सादर केले. सीमालढ्यात अनेक कार्यक्रम गाजवणाऱ्या शाहीर चंदगडकर यांना मोठ्या पडद्यावर गीत सादर करण्याची संधी मिळताच त्यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांची व्यथा सर्वांसमोर ठेवली.









