नात्यांच्या गुंतवणुकीत एखादं असं नातं असतं ज्याला कुठलंच नाव देता येत नाही. चारचौघात त्याबद्दल उघडपणे बोलणं म्हणजे समाजाच्या अकारण चर्चेला सामोरं जाणं असतं. दोघांपैकी कुणाचाच दोष नसतो कारण मनाचं मनोगत आजपर्यंत कुणाला कळलंय का? मन कधी कुणावर जडेल, कुणासाठी जीव अडेल आणि कोण कधी कुणाच्या प्रेमात पडेल हे एक वर्तविता न येणारं भविष्य असतं. परिस्थितिवश द्रौपदी पाच पांडवांची पट्टराणी झाली. सहाव्याचा म्हणजेच प्रथम कौंतेयाचा विचार तिच्या मनात एकदा रुंजी घालून गेला आणि जांभूळ आख्यान घडलं. मोहापायी झालेलं वैचारिक स्खलनही तिला तेव्हा परवडण्यासारखं नव्हतं. पण लग्नाच्या आधीपासूनच तिने मनात जपलेलं तिच्या सर्वात जवळचं नातं मात्र वेगळंच होतं. तो तिचा सखा होता. तिला हळुवारपणे जपणारा प्रिय होता. तिच्या हाकेला ऐनवेळी धावून येणारा पाठीराखा होता. तिच्या सौंदर्याचं, बुद्धिमत्तेचं सर्वात जास्त आणि निरपेक्ष कौतुक असणारा तो तिचा मित्र होता. बंधु या शब्दाचा अर्थ खरंतर भाऊ असा नसून जो आपल्याशी भावबंधित आहे तो, म्हणजेच मित्र असा होतो. त्या अर्थाने तो तिचा बंधु होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो सारथी होता. शिष्टाई करणारा होता. उपदेशक होता. जिथे जिथे म्हणून तिला किंवा तिच्या कुटुंबाला गरज भासेल तिथे तिथे तो हजर होता. म्हणून तर
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती त्याचा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खुण
असं त्याचं वर्णन केलंय. ही अंतरीची खूण त्याच्या बाबतीत प्रत्येकीला पटायचीच! मजा अशी की त्या सर्वजणींना त्याने खूप काही दिलं. ओंजळ भरभरून दिलं. देहावर मावणार नाहीत इतके मधुर रोमांच दिले आणि मनात मावणार नाही इतकं भरभरून सुख दिलं. त्याचं अस्तित्त्व मुळी असं होतं कुणालाही त्याच्यावर राग धरता आला नाही. एकदा का तो गोड हसला की झालंच विरघळायला!
आता राधेचीच गोष्ट घ्या ना! तिच्या आयुष्यात तो आला तेव्हा तो बालक आणि ती किशोरी! पण येता जाता उठता बसता तिच्या मनात तोच!अगदी
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
वसशी कोठे गोपाळा गोविंदा
अशी तिची अवस्था करून सोडावी का त्याने? चांगली शहाणी सुरती, रूपगुणाची खाण असलेली ती राधा इतकी वेडी झाली त्याच्यासाठी
की सारं गोकुळ कुजबुज करायला लागलं.
राधा कृष्णावरी भाळली
गुजगुज उठली गोकुळी
बरं त्याचं खटय़ाळपण असं की दिवसभर तिने धुण्याच्या निमित्त, पाण्याच्या निमित्ताने यमुनेवर खेपा घालाव्या आणि त्याने तिच्या दृष्टीसच पडू नये! थकून भागून तिने संध्याकाळी आशेने अखेरची खेप घालावी तर त्याने तिची वाटच अडवायची? काय हा अगोचरपणा? बरं घागर रिकामी आणि कुंजवनात तिच्यासाठी हिंदोळा बांधून त्याने मोठय़ा आग्रहाने तिला झोके द्यावे आणि बासरी ओठी धरून तिची तहानभूक तिला विसरायला लावावं!
घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा
सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कालिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा
इतकी विनंती तिने केली तरी तिला सोडूच नये त्याने? चहूकडे गोड कापरा सुगंधी अंधार दाटावा आणि त्याच्या साक्षीने जे काही घडतं त्याचा कुणालाच कसलाच हिशेब लागू नये? बरं राधा तर राधा. पण सगळय़ा गोपींनाही तीच बाधा? शरदाच्या चांदण्यात रंगलेली रासलीला वृंदावनात आजही नित्य रंगते म्हणतात. इतकी, की वृंदावनात आज चोहीकडे इमारती झाल्यात पण प्रत्यक्ष वनाच्या दिशेने असलेले दरवाजे खिडक्मया कायम बंदच असतात. त्या वनाकडे जाणाऱया वाटा रात्री बंद असतात.
गोपी मात्र
रास खेळू चला रंग उडवू चला
आला आला गं कान्हा आला
म्हणत कायमच्या बेभान झाल्या होत्या. प्रत्येकीशी कान्हय़ाने रासलीला खेळली होती. प्रत्येकीला वाटे की तो फक्त माझा आहे. तो मात्र अलिप्त.
रुक्मिणीला हक्काने पळवून आणताना तिला अपार अभिमान आणि आनंद देणारा. नवपरिणितेला दुःख नको म्हणून तिच्या भावाला क्षमा करणारा तोच… सगळं राजकाज उरकून आल्यावर चिडलेल्या बायकोची समजूत काढण्यासाठी
करपाशी या तनुला बांधुन करि शिक्षेला
धरुनीया केशाला दंतव्रण करि गाला
कुचभल्ली वक्षाला टोचुनि दुखवी मजला
इतका चावट छळवादीपणा करणं हेही त्यालाच जमावं! रुक्मिणीने आपली लज्जा ओंजळीत किती म्हणून दडवावी? सत्यभामा आणि रुक्मिणी दोघींनाही फसवीत देववृक्ष पारिजात आणून निघून जातो आणि मग
बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी?
माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणी जन तिजला म्हणती
दुःख हे भरल्या संसारी.
असं तिने स्वतःच स्वतःला समजावत राहायचं. तेही झोपाळय़ावर बसून. जिथे तिच्या प्राणप्रिय वल्लभासोबत ती बसते. अंग अंग मोहरून सोडणाऱया पूर्ण पुरुषाचा तो अतीव सुखद स्पर्श तिला झाला. ती धन्य झाली.
अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा वेळी
विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळय़ांमधले थेंब सुखाचे
हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव…
म्हणण्याइतका तिचाही त्याच्यावर अधिकार झाला. अशा आणखी कितीजणी? सोळा हजार एकशे आठांनीही ती संख्या संपत नाही. कुमारी असो नाहीतर सुवासिनी किंवा भक्ता, त्याच्या प्रेमात बुडतेच…मग संध्याकाळी पावा ऐकू आला की देवाजवळ दिवा लावणारे हात थबकतात. हात जोडताना काकणांची अस्वस्थ किणकिण होत राहते. ज्याला आपण सोलमेट सोलमेट म्हणतो ना? त्यालाच कृष्णसखा म्हणतात बरं!
ऍड. अपर्णा परांजपे-प्रभु








