दिल्लीतील नाझ जोशी नामक तृतियपंथीय व्यक्तीची ही हृदयस्पर्शी व्यथा आहे. नाझ जोशी या भारताच्या प्रथम तृतियपंथी मॉडेल आहेत. मॉडेलिंगच्या क्षेत्रात त्यांनी यश मिळविले असले तरी सामाजिक आयुष्यात त्यांच्या पदरी पदोपदी मानहानी आणि तिरस्कारच पडला आहे, असे त्या सांगतात. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्या मुलगा आहेत, असे मातापित्यांना वाटले. तथापि, त्यांची वाढ होऊ लागली त्यावेळी त्यांच्यातील स्त्रwण गुणधर्म दिसून येऊ लागले. त्यामुळे मातापित्यांनी त्यांचा त्याग केला. बालपणापासूनच त्यांना अनाथ व्यक्तीप्रमाणे वागणूक मिळाली. त्या अकरा वर्षांच्या असताना त्यांना एका क्यक्तीकडे पाठविण्यात आले. ही व्यक्ती त्यांचा मामा असल्याचे सांगण्यात आले. तथापि, तेथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तेव्हापासून त्या समाजाचे हे क्रौर्य अनुभवतच मोठय़ा झाल्या आहेत, अशी व्यथा त्यांनी मांडली आहे.
त्यांना शिक्षणाची अतिशय आवड होती. पण पैसा नसल्याने शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना शरीर विकावे लागले. डान्सबारमध्ये ओंगळ नृत्य करावे लागले. शरीरविक्रय करून मिळालेल्या पैशातून त्यांनी एक संगणक आणि मोबाईल खरेदी केला. एकदा अचानक त्यांना आर्कुटवर त्यांची एक नातेवाईक महिला भेटली. एव्हाना त्या मुंबईत आल्या होत्या आणि या अनोळखी महानगरीत त्यांना या नातेवाईक महिलेचाच आधार होता. या महिला नातेवाईकाच्या प्रेरणेने त्यांनी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या परीक्षा दिल्या. सर्व परीक्षांमध्ये त्या उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी मॉडेलिंग आणि फॅशन डिझायनरचा व्यवसाय सुरू केला. आतापर्यंत भारतात कोणतीही तृतियपंथी व्यक्ती या व्यवसायात उतरलेली नव्हती. त्यांना व्यावसायिक यशही मिळाले. तथापि, समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी मात्र अजूनही बदललेली नाही. त्या तृतियपंथी आहेत, हा जणू काही त्यांचाच अपराध आहे, अशा पद्धतीने जवळचे लोकही त्यांच्याकडे पाहतात. तसेच त्यांच्याकडून नको त्या अपेक्षाही ठेवल्या जातात. किंबहुना या अपेक्षा पूर्ण करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे, अशी लोकांची भावना असते. कित्येकदा याचा आपल्याला संताप येतो, मनस्ताप तर नेहमीचाच आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली आहे. मात्र, त्यांनी हार मानलेली नाही. 2015 मध्ये त्यांनी भारतात पहिली तृतियपंथीय सौंदर्य स्पर्धा आयोजित केलेली होती. आता त्यांना प्रसिद्धी भरपूर मिळते. अनेक नियतकालिकांमधून त्यांची माहिती आणि जीवनसंघर्ष प्रसिद्ध झालेला आहे. 23 वर्षांनी त्यांनी जेव्हा आपल्या वडिलांना पाहिले, तेव्हा ते वृद्ध झालेले होते. वडिलांनी त्यांची क्षमाही मागितली. यावेळी त्यांना भरून आले. तथापि, ज्या सन्मानाची त्यांना अपेक्षा आहे, तो मात्र मिळत नाही, ही त्यांची व्यथा खरेतर समाजाचे डोळे उघडणारी असून त्यावर विचार होणे आवश्यक आहे.









