प्रत्येक कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळण्याची आस असते, हे सर्वश्रुत आहे. ती मिळाली नाही, तर कर्मचारी धुसफुसतात. आपण काम करुनही आपल्यावर अन्याय होत आहे, अशी त्यांची भावना होते. तथापि, अमेरिकेत अशी एक घटना घडली आहे, की एका कंपनीच्या कर्मचारी महिलेने तिला पदोन्नती न मिळाल्यामुळे सारी कंपनीच खरेदी केली आणि प्रत्यक्ष तिच्या मूळ मालकालाच ‘नोकरी’वरुन काढून टाकले. ही घटना नुकतीच घडली असून या महिलेचे नाव ज्युलिया स्टीवर्ट असे असून कंपनीचे नाव ‘अॅपलबीझ’ असे आहे. ही घटना अतियश स्वारस्यपूर्ण आहे.
ज्युलिया स्टीवर्ट यांना या कंपनीत ‘अध्यक्ष’ या पदावर नियुक्त करण्यात आले होते. नियुक्तीच्या वेळी त्यांना असे आश्वासन देण्यात आले, की जर कंपनी नफ्यात आली, तर त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती दिली जाईल. त्यांनी कष्ट करुन कंपनी नफ्यात आणून दाखविली. तथापि, त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारीपद (सीईओ) देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी अक्षरश: ही कंपनीच विकत घेतली. त्यामुळे कंपनीचा मूळ मालक आता त्यांचा ‘नोकर’ बनला. त्याला नोकरीवरुन काढून टाकून त्यांनी त्यांचा ‘सूड’ पूर्ण केला. स्टीवर्ट बाईंनी या कंपनीसाठी बरेच कष्ट उपसले होते. त्यांनी कंपनी नफ्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांची एक टीम बनविली होती. या टीमच्या प्रत्येक सदस्याला विशिष्ट कामे, त्याच्या क्षमतेनुसार नेमून देण्यात आली होती. या व्यवस्थापनपद्धतीमुळे ही कंपनी लवकरच नफ्यात आली होती. कंपनीची स्थिती सुधारल्यानंतर मूळ मालकामधला स्वार्थ जागा झाला. त्याने आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला. स्टीवर्ट बाई जास्तीत जास्त काय करतील, तर नोकरी सोडतील, असे त्याला वाटले असावे. पण या बाई भलत्याच चिवट निघाल्या. त्यांनी नोकरी सोडली तर नाहीच. पण कंपनीच विकत घेऊन त्या चक्क मालकच बनल्या. आता अधिकार गाजविण्याची संधी त्यांना होती. त्यांनी ती यथास्थित साधली असून मूळ मालकालाच कंपनीतून काढले आहे.









