महिला सबलीकरणास प्राधान्य : सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न
खानापूर तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर तालुक्याचे नेतृत्व केले आहे. काँग्रेसने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामांचा आढावा तसेच त्यांच्या पुढील नियोजनाबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत.
स्वातंत्र्यानंतर खानापूर तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार म्हणून काय अनुभव होता?
खानापूर मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच मी महिला आमदार म्हणून निवडून आली आहे. इंदिरा गांधींच्या विचारांना चालना देण्यासाठी म्हणून खानापूर तालुक्यातील मतदारांनी मला मान दिला. त्याबद्दल मी त्यांची प्रथमत: ऋणी आहे. महिला आमदार म्हणून मला तालुक्यातून भरघोस पाठिंबा तर मिळालाच, त्याचबरोबर तालुक्यातील जनतेने माझ्यावर प्रेमही तितकेच केले आहे. त्यामुळे येथे काम करताना मी आनंदाचा अनुभव घेतला.
आमदार म्हणून तुम्ही तालुक्यातील जनतेला कसा न्याय दिला?
तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आमदार झाल्यापासून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हाच मी ध्यास आणि ध्येय ठेवले. यासाठीच मी गेली पाच वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहे. तालुक्यातील वाड्या- वस्त्यांवर पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याला बऱ्यापैकी यशही आले आहे. हे करत असताना राज्यात विरोधी भाजप सरकारमुळे प्रत्येक वेळी विकासकामात राजकारण आणून अडथळा, आडमुठे धोरण घेण्यात येत होते. मात्र, मी सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सरकारदरबारी सातत्याने पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणण्यात यशस्वी झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात बऱ्यापैकी विकासकामे झाली आहेत.
तालुक्यातील मुख्य विकासकामे कोणती?
मी स्वत: स्त्रीरोग तज्ञ आहे. महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांची मला चांगलीच जाण आहे. यासाठी तालुक्याच्या ठिकाणी महिला व बालसंगोपनसाठी 60 खाटांचा सुसज्ज दवाखाना मंजूर करून त्याचे काम पूर्ण झालेले आहे. 100 खाटांचा आणखी एक दवाखानाही मंजूर करून घेतला आहे. पारिश्वाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे विस्तारीकरण करून 30 खाटांचा दवाखाना सेवेत आहे. कर्नाटकातील हा पहिलाच प्रकल्प असल्याने मला अभिमान वाटत आहे. मी महिलांना न्याय देण्यात काही अंशी यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे. तालुक्यात विद्युत समस्या फार मोठी होती. तालुक्याच्या विस्ताराच्या मानाने विद्युतपुरवठा करणारी केंद्रे होणे गरजेचे होते. यासाठी हलशी आणि बैलूर येथे 33 के. व्ही. ची दोन उपकेंद्रे मंजूर झाली आहेत. त्याचबरोबर 600 शाळाखोल्या, 60 अंगणवाडी इमारती, पदवीपूर्व महाविद्यालय, पदवी महाविद्यालय, आयटीआय केंद्रे यासह शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात रयत संपर्क केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, यंत्रसामग्री, खते पुरवली जातात. या सुविधा शेतकऱ्यांना जवळच उपलब्ध झाल्याने समाधान आहे. तालुक्याच्या जंगल भागात गावे वसली आहेत. या गावांना रस्त्यांच्या समस्या मोठ्या होत्या. या गावांचा पावसाळ्यात सहा सहा महिने शहराशी संपर्क तुटत होता. यासाठी दुर्गम भागातील गावांना रस्ते मंजूर करून घेतले आहेत. वनखात्याच्या तांत्रिक अडचणींमुळे काही गावांना रस्ते अद्याप झालेले नाहीत. मात्र, तांत्रिक अडचणींतून मार्ग काढून रस्ते करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
► काँग्रेसच्या जाहीरनाम्याला जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो?
काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचे जगणे सुकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलेला आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने विविध उपक्रमांद्वारे सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आज महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारीने देशात हाहाकार माजवला आहे. सर्वसामान्यांचे जगणे आनंदी करण्यासाठी काँग्रेसने सहा गॅरंटी दिलेल्या आहेत. यात महिलांना मोफत बसप्रवास, कुटुंबाला दोनशे युनिट वीज मोफत, बेरोजगारांना मासिक मानधन, बीपीएल कार्डवर 10 किलो तांदूळ, अंगणवाडी, मध्यान्ह आहार योजनेतील कर्मचाऱ्यांना भरीव मासिक वेतन आणि निवृत्तीनंतर आर्थिक मदत अशा विविध गॅरंटी जाहीर केलेल्या आहेत. याचा नक्कीच सामान्य जनतेवर चांगला लाभ होणार आहे. खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. उर्वरित विकासकामांची पूर्तता करणे हेच माझे ध्येय आहे. समाजाची सेवा करणे माझा ध्यास असल्याने मी राजकारणाला महत्त्व देत नाही. विरोधकांकडे माझ्या विरोधात मुद्दाच नसल्याने ते माझ्या बाबतीत खोटा प्रचार करत आहेत. पण सूज्ञ जनता या निवडणुकीत त्यांना चोख उत्तर देणार आहे.









