पुतीन यांचा निकटवर्तीय युक्रेनच्या ताब्यात
युक्रेनच्या नागरिकांच्या सुटकेची झेलेंस्कींकडून मागणी
रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनने विरोधी पक्षाचे नेते व्हिक्टर मेदवेदचुक यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. युक्रेनची गुप्तचर यंत्रणा एसबीयूने काही छायाचित्रे प्रसारित केली असून यात मेदवेदचुक यांच्या हातात बेडय़ा ठोकण्यात आल्याचे दिसून येते. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनीही मेदवेदचुक यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले आहे. मेदवेदचुक यांना रशियाचे समर्थक मानले जाते. तसेच रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे.
व्हिक्टर मेदवेदचुक यांना मागील वर्षी देशद्रोहाच्या आरोपाखाली नजरकैद करण्यात आले होते. मेदवेदचुक चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये फरार झाले होते. आता त्यांना युक्रेनने पुन्हा ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी मेदवेदचुक यांच्या सुटकेच्या बदल्यात युक्रेनियन नागरिक आणि सैनिकांच्या मुक्ततेचा प्रस्ताव रशियासमोर ठेवला आहे.
मेदवेदचुक यांना ताब्यात घेण्यात आल्याची छायाचित्रे आम्ही पाहिली आहेत, परंतु या घटनेची अद्याप पुष्टी झालेली नाही. अनेक खोटी वृत्ते प्रसारित करण्यात येत असल्याने या छायाचित्रांमध्ये किती सत्य आहे हे सांगता येत नसल्याचे विधान रशियाचे राष्ट्रपती भवन क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी केले आहे.
व्हिक्टर मेदवेदचुक युक्रेनचे खासदार राहिले असून विरोधी पक्ष पार्टी फॉर लाइफचे नेते आहेत. फॉर लाइफला रशियाचे समर्थक मानले जाते. फॉर लाइफसह 11 राजकीय पक्षांवर रशियाचे समर्थक असल्याप्रकरणी झेलेंस्की यांनी मागील महिन्यात बंदी घातली होती.
रशियात जन्म, अब्जाधीश नेता
व्हिक्टर मेदवेदचुक यांचा जन्म 7 ऑगस्ट 1954 रोजी रशियाच्या क्रेस्नोयार्स्क क्राइमध्ये झाला होता. 1960 च्या दशकात मेदवेदचुक यांचे कुटुंब युक्रेनमध्ये परतले होते. 1972 मध्ये मेदवेदचुक यांनी कीव्ह रेलरोड पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. 1978 मध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करत त्यानंतर अनेक वर्षांपर्यंत वकिली केली होती. 1990-97 पर्यंत ते युक्रेन बार असोसिएशनचे अध्यक्षही राहिले. मेदवेदचुक हे युक्रेनच्या अब्जाधीशांपैकी एक आहेत. मेदवेदचुक हे युक्रेनमधील तीन टीव्ही वाहिन्यांचेही मालक आहेत. अलिडकेच युक्रेनने या वाहिन्यांवर रशियाच्या बाजूने दुष्प्रचार चालविल्याप्रकरणी बंदी घातली आहे.
पुतीन यांचे विश्वासू मित्र
व्हिक्टर मेदवेदचुक आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे परस्परांचे घनिष्ठ मित्र आहेत. दोघेही पहिल्यांदा 2003 साली भेटले होते. 2004 मध्ये मेदवेदचुक यांना दुसरी कन्या झाली होती. आपली कनिष्ठ कन्या डायराचे पुतीन हे गॉडफादर असल्याचे त्यांचे सांगणे होते. मेदवेदचुक यांना पुतीन यांच्या वर्तुळातील सदस्य मानले जाते.
अनेक वर्षे राजकारणापासून दूर
मेदवेदचुक यांचा राजकीय प्रवास 1994 पासून सुरू झाला. तेव्हा त्यांनी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ युक्रेनमध्ये प्रवेश केला. 1997 मध्ये ते युक्रेनच्या संसदेत निवडून आले. 2002 मध्ये पुन्हा खासदार म्हणून विजयी झाले. मेदवेदचुक यांचा युरोपीय महासंघाला विरोध राहिला आहे. 2004 मध्ये युक्रेनमध्ये ऑरेंज रिव्हॉल्युशन झाल्यावर मेदवेदचुक यांनी राजकारणापासून अंतर राखले. 2006 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती. 2018 मध्ये ते पार्टी फॉर लाइफचे अध्यक्ष झाले. 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 37 जागा जिंकल्या.
देशद्रोहाचा आरोप
19 फेब्रुवारी 2021 रोजी युक्रेनच्या डिफेन्स सिक्युरिटी कौन्सिलने मेदवेदचुक आणि त्यांच्या पत्नी ओक्सानावर बंदी घातली. दोघांवर युक्रेनमधील दहशतवादी कारवायांकरता वित्तपुरवठा केल्याचा आरोप होता. याप्रकरणी मेदवेदचुक यांना देशद्रोहाचा गुन्हेगार ठरविण्यात आले. मे 2021 मध्ये त्यांना नजरकैद करण्यात आले होते. 27 फेब्रुवारी रोजी मेदवेदचुक हे गायब झाले होते.
महाविनाशक अस्त्रासोबत दिसले पुतीन, बेलारुस अध्यक्षांची पुतीन यांच्याशी चर्चा

युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याला 49 दिवस झाले असून दोघांमधील भीषण संघर्ष सुरूच आहे. याचदरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी बेलारुसचा हुकुमशहा अलेक्झेंडर लुकाशेंको यांच्यासोबत मंगळवारी अंतराळ केंद्राचा दौरा केला आहे. यादरम्यान पुतीन यांच्यासोबत पूर्ण जगाला नष्ट करण्यास सक्षम ‘न्युक्लियर फुटबॉल’ दिसून आला. रशिया आता कधीच पाश्चिमात्य देशांवर निर्भर राहणार नसल्याचे पुतीन यांनी यावेळी म्हटले आहे. पुतीन यांनी न्युक्लियर फुटबॉलला दर्शवुन युक्रेन युद्धादरम्यान जगासमोर स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन केल्याचे मानले जात आहे.
पुतीन यांच्यासोबत त्यांचा सुरक्षारक्षक हा ‘न्युक्लियर फुटबॉल’ घेऊन चालत होता. काळय़ा रंगातील या ब्रीफकेसच्या मदतीने पुतीन जगात कुठेही आण्विक हल्ला करू शकतात. यापूर्वी मागील आठवडय़ात पुतीन स्वतःच्या आण्विक ब्रीफकेससह दिसून आले होते. रशिया जगातील सर्वात मोठी आण्विक शक्ती आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स या संस्थेच्या अहवालुनसार रशियाकडे 5,977 अण्वस्त्रs आहेत.
युक्रेनवरील हल्ल्याबद्दल माझ्या मनात कुठलीच साशंकता नाही. यामागील लक्ष्य पूर्णपणे स्पष्ट आहे. आमच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता हे देखील स्पष्ट आहे. हा एक योग्य निर्णय होता. आमचा उद्देश पूर्ण होत नाही तोवर युक्रेनमधील सैन्य मोहीम सुरूच राहणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.
युक्रेनमधील मोहीम योजनेनुरुप सुरू आहे. रशिया नुकसान कमी करू इच्छित असल्याने ही मोहीम अधिक वेगाने साकारणे टाळले जात आहे. इस्तंबुल येथील रशियाच्या संवादकांसोबतच्या चर्चेदरम्यान करण्यात आलेल्या प्रस्तावांपासून युक्रेनमध्ये माघार घेतल्याने चर्चेत अडथळा निर्माण झाला. रशियाकडे यामुळे स्वतःच्या आक्रमक भूमिकेसह पाऊल टाकण्याशिवाय अन्य कुठलाच पर्याय राहिला नसल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे.
रशियाला कब्जा करू देणार नाही ः झेलेंस्की

रशियाच्या सैन्याकडून अनेक शहरे उद्ध्वस्त
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. रशियाच्या सैन्याने पूर्वीच पूर्ण युक्रेनला उद्ध्वस्त केले आहे. आता आम्ही त्यांना आमच्या कुठल्याही हिस्स्यावर कब्जा करू देणार नाही. आम्ही पूर्वीच अनेक सैनिक आणि नागरिकांचे जीव गमावलो आहोत, आता आणखीन लोकांना गमावू इच्छित नसल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
शांतता करारात युक्रेनला काही भूभाग देण्यासाठी दबाव आणला जाईल, परंतु मी कुठल्याही स्थितीत स्वतःच्या देशाचा कुठलाच हिस्सा देण्यासाठी तयार नाही. पुतीन आमच्या देशाचा दक्षिण हिस्सा बळकावू पाहत आहेत आणि क्रीमियाला रशियन क्षेत्राच्या स्वरुपात मान्यता मिळवून देण्याचा त्यांचा डाव असला तरी तो आम्ही हाणून पाडू. पुतीन यांच्या मागण्यांना भीक न घातल्यानेच हे युद्ध सुरू झाले असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
युद्धात आतापर्यंत रशियाचे 19,600 सैनिक मारले गेले आहेत. तर रशियाचे 732 रणगाडे आणि 157 विमानांना युक्रेनने नष्ट केले आहे. रशिया आता सातत्याने खारकीव्हवर हल्ले करत आहे. या युद्धात आतापर्यंत 183 युक्रेनियन मुलांना जीव गमवावा लागला आहे. तर 342 मुले जखमी झाली आहेत.
रशिया-फिनलंड संघर्षाचा धोका

युक्रेन युद्धादरम्यान आता फिनंलड आणि रशियातील संघर्षाचा धोका वाढला आहे. फिनलंडने अलिकडेच नाटोत सामील होण्यासाठी स्वारस्य दर्शविले आहे, यामुळे संतप्त पुतीन यांनी शस्त्रास्त्रांनी सज्ज रशियाचे सैन्य फिनलंड सीमेच्या दिशेने पाठविले आहे. फिनलंडसह स्वीडनने देखील नाटोमध्ये सामील होण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.
रशियाने स्वतःच्या शेजारी देशाला नाटोत सामील होण्याच्या विरोधात इशारा दिला तसेच काही तासांनी क्षेपणास्त्र प्रणालीसह रशियन शस्त्रास्त्रांना फिनलंडला लागून असलेल्या सीमेच्या दिशेने रवाना केले आहे.
आमचे सरकार नाटो सदस्यत्वासाठी अर्ज करण्याशी संबंधित चर्चा लवकरच समाप्त करेल अशी अपेक्षा असल्याचे उद्गार फिनलंडच्या पंतप्रधान सना मारिन यांनी अलिकडेच काढले होते. मारिन यांच्या या विधानानंतर पुतीन यांच्या संतापात भर पडली आहे. फिनलंडमधील 84 टक्के लोकांनी रशिया त्यांच्या देशासाठी गंभीर सैन्य धोका असल्याचे म्हटले आहे.
मारिन यांच्या विधानाच्या प्रत्युत्तरादाखल पेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी या पावलामुळे युरोपच्या स्थितीत सुधारणा होणार नसल्याचे म्हटले आहे. तर रशियाचे खासदार ब्लादिमीर दजबारोव्ह यांनी फिनलंडने अशाप्रकारचा निर्णय घेतल्याचा त्याचा विनाश होईल असे विधान केले आहे.
ब्रिटनच्या क्षेपणास्त्रांचा युक्रेनकडून मोठा वापर

रशियाचे ओरियन ड्रोन पाडविले ः
युक्रेनच्या सैनिकांनी ब्रिटनकडून निर्मित क्षेपणास्त्रांद्वारे रशियाचे ओरियन ड्रोन पाडविले आहे. रशियन ओरियन ड्रोन पाडविल्यावर जल्लोष करत युक्रेनच्या सैनिकांनी ब्रिटनचे आभार मानले आहेत. युक्रेनियन सैनिकांनी लेझर गायडेड स्टारस्ट्रेक क्षेपणास्त्राद्वारे रशियन ड्रोनला लक्ष्य केले. हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगाच्या तीन पट अधिक वेगाने स्वतःच्या लक्ष्यावर हल्ला करते. युक्रेनचे सैनिक यूरी कोचेवेन्को यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केल आहे. ब्रिटन युक्रेनच्या सैनिकांना विमानविरोधी क्षेपणास्त्रांसह बॉडी आर्मर, हेल्मेट आणि कॉम्बॅट बुट्सचा पुरवठा करत आहे.
ओरियन ड्रोन कमाल 200 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उड्डाण करू शकतो. या ड्रोनला रशियाच्या क्रोनस्टेड समुहाने विकसित केले आहे. रशियाने आतापर्यंत याच्या 30 युनिट्सची निर्मिती केली आहे. हा ड्रोन 200 किलोपर्यंत वजनाची अस्त्रs वाहून नेऊ शकतो. ओरियन ड्रोनची उड्डाणकक्षा 250 किलोमीटरची असून त्याला 8 हजार मीटरच्या कमाल उंचीपर्यंत ऑपेरट केले जाऊ शकते. हा ड्रोन एकदा उड्डाण केल्यावर 24 तासांपर्यंत आकाशात राहू शकतो. रशियाने सीरियात या ड्रोनचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला होता. तेव्हा या ड्रोनने जमिनीवरील अनेक लक्ष्यांना नष्ट केले होते.









