इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात पुन्हा युद्धाची ठिणगी पेटली आहे. पॅलेस्टाईची दहशतवादी संघटना ‘हमास’ ने इस्रायलवर 7 हजारांहून अधिक अग्निबाणांचा अनपेक्षित मारा करुन प्रथम कळ काढली. आता इस्रायल त्याला त्याहीपेक्षा तीव्र प्रत्युत्तर देणार हे निश्चितच होते. झालेही तसेच. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे मध्यपूर्व पुन्हा एकदा भडकणार हे उघड आहे. तसे पाहिल्यास इस्रायल, पॅलेस्टाईन आणि पॅलेस्टाईनच्या पाठीशी असणारी अवती-भोवतीची अरब राष्ट्रे यांच्यातील संघर्ष इस्रायलच्या निर्मितीपासूनचाच आहे. आता त्याने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे या कधी सुप्त तर कधी संघर्षाचा संक्षिप्त मागोवा घेणे क्रमप्राप्तच आहे….
रक्तरंजित संघर्षाला धर्माची पाश्वूभूमी…
इस्रायलचा जन्म…
ड दुसऱ्या महायुद्धानंतर अरबी वाळवंटात इस्रायल या ज्यू देशाची निर्मिती करण्यात आली आहे. ही निर्मिती अमेरिकेच्या पुढाकाराने ब्रिटन, फ्रान्स इत्यादी पाश्चिमात्य देशांनी केली. इस्रायल ही मूळची ज्यूंचीच मातृभूमी. पण जवळपास 3 हजार वर्षे हा ज्यूधर्मिय समाज आपल्या मातृभूमीपासून वंचित होता. ती त्यांना परत मिळवून देण्याचे वचन प्रत्यक्ष देवानेच दिले आहे, अशी ज्यूंची अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे या भूमीला ‘प्रॉमिस्ड लँड’ असे त्यांच्या धर्मग्रंथातही संबोधले जाते.
ड ज्यू धर्मियांच्या इतिहासात अनेकदा या समाजावर अनेक अन्य देशांच्या समाजांनी किंवा सत्ताधाऱ्यांनीं अत्याचार करुन त्यांना तेथून बाहेर काढल्याचे प्रसंग आहेत. 1,400 वर्षांपूर्वी इस्लाम धर्माच्या जन्मानंतर मुस्लीमांनी त्यांचे मदिनेतून उच्चाटन केले. त्याहीपूर्वी दीड हजार वर्षे त्यांना इजिप्त सोडावे लागले होते. अगदी अलिकडच्या काळात हिटलरकडून त्यांचे शिरकाण झाले होते. अशा प्रकारे हजारो वर्षांपासून सातत्याने होत असलेली अवमानना इस्रायलच्या जन्मानंतर संपली.
ड इस्रायलच्या निर्मितीची प्रक्रिया दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ होण्यापूर्वीच झाली होती. 1935 पासून या देशाच्या निर्मितीचे, खरे तर पुनर्निमितीचे पडघम वाजू लागले होते. दुसरे महायुद्ध 1939 पासून 1945 पर्यंत चालले. त्यामुळे या देशाची निर्मिती प्रक्रिया काहीशी लांबली, असे म्हटले जाते. त्यानंतर 1948 मध्ये इस्रायल हे ज्यूंचे राष्ट्र अधिकृतरित्या जन्माला आले. त्यानंतर जगभरात विविध देशांमध्ये विखुरलेले ज्यू लोक मोठ्या प्रमाणात आपल्या मातृभूमीत स्थायीक झाले.
अरब मुस्लीमांशी संघर्ष का ?
ड अरब भूमी मुस्लीमांसाठीच आहे. अन्य धर्मियांना तेथे स्वत:चे राज्य स्थापन करता येणार नाही, अशी या भागातील अरबांची समजूत आहे. त्यामुळे अशा अरब मुस्लीम भूमीत ज्यूधर्मियांचे राज्य स्थापन होणे हे त्यांच्या धार्मिक भावनेच्या विरुद्ध होते. त्यामुळे इस्रायलच्या जन्मापासूनच त्याला नष्ट करण्याचा चंग अरब राष्ट्रांनी बांधला होता. त्यानुसार त्यांनी अगदी 1948 पासून, अर्थात इस्रायलच्या जन्मापासूनच त्याचा गळा घोटण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत.
ड इस्रायल-अरब संघर्षाला अशा प्रकारे प्रामुख्याने धार्मिक पार्श्वभूमी आहे. त्याशिवाय, इस्रायलच्या माध्यमातून पाश्चिमात्य राष्ट्र अरब भूमीत हस्तक्षेप करतील ही अरब राष्ट्रांची भावनाही याला कारणीभूत आहे. पण अरब देशांचे आव्हान इस्रायलने निर्धाराने स्वीकारले. अत्यंत थोडक्या काळात प्रचंड तंत्रवैज्ञानिक प्रगती साधून त्यांनी आर्थिक आणि शस्त्रबळात अरबांना मागे टाकले. त्यामुळे सर्व अनेक अरब राष्ट्रांनी एकत्र येऊन या देशाला संपविण्याचा प्रयत्नही अयशस्वी ठरला.
इस्रायलचा भूमीविस्तार
ड ज्या ज्या वेळी अरब देशांनी इस्रायलशी युद्ध केले, तेव्हा त्यांचा पराभव तर झालाच, शिवाय त्यांना त्यांची भूमीही गमवावी लागली आहे. निर्मितीनंतर पुढच्या दोन दशकांमध्ये इस्रायलने सिरीया, लेबेनॉन, इजिप्त इत्यादी अवतीभोवतीच्या देशांची भूमी आपल्या आधीन करुन आपल्या मूळ भूमीचा विस्तार दुपटीहून अधिक वाढविला आहे. इतकेच नव्हे, तर अलिकडच्या काळात ज्यू. ख्रिश्चन आणि मुस्लीम या तीन्ही धर्मांसाठी पवित्र मानल्या गेलेल्या जेरुसलेम या ऐतिहासिक शहरावरही संपूर्ण नियंत्रण मिळविले आहे. ही बाबही अरब देशांना खुपते.
ड इस्रायलला अमेरिकेचे पूर्ण पाठबळ आहे. अमेरिकेत कोणत्याही पक्षाचे अध्यक्ष असले तरी इस्रायलसंबंधी त्यांची भूमिका जवळपास समानच म्हणजे सहकार्याचीच असते. अमेरिकेने इस्रायलला मोठे आर्थिक साहाय्य त्याच्या जन्मापासून केले आहे. तथापि, इस्रायलने या साहाय्याचा उपयोग योग्य प्रकारे करुन आणि आपल्या कष्टाची जोड त्याला देऊन कृषी, अभियांत्रिकी, सामरिक आणि आर्थिक अशा सर्व आघाड्यांवर स्वत:ची प्रगती करुन घेतली आहे. अनेक अरब देशांजवळ पेट्रोडॉलर्स असूनही त्यांना हे जमलेले नाही, ही भावनाही संघर्षाचे एक कारण आहे.
पॅलेस्टाईन काय आहे…
ड खरे तर आज ज्या भूमीवर इस्रायल आहे, ती पॅलेस्टाईन भूमी म्हणूनच तेथील ज्यू बाहेर गेल्यानंतर ओळखली जात होती. याच भूमीच्या एका भागात इस्रायलची स्थापना करण्यात आली. नंतर इस्रायलने गाझा पट्टी आणि उरलेल्या पॅलेस्टाईनवर नियंत्रण मिळविले. या दोन भागांमध्ये अरब मुस्लीमांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. आपल्यावर एका ज्यू देशाचे नियंत्रण आहे, ही बाब पॅलेस्टाईन अरबांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे ते सातत्याने इस्रायलवर जमेल त्या मार्गाने हल्ले करत असतात. ताजे युद्धही अशाच कारणाने होत आहे.
ड हमास ही दहशतवादी संघटना इस्रायलशी संघर्षात आघाडीवर आहे. या संघटनेला श्रीमंत अरब देश गुप्तपणे आर्थिक साहाय्य करतात, असे बोलले जाते. स्वत: इस्रायलशी थेट भिडण्यापेक्षा हे देश हमासला पुढे करुन इस्रायलसमोर संकटे उभी करण्याचा प्रयत्न करतात, असाही आरोप केला जातो. त्यामुळे अलिकडच्या काळात हमासचे महत्व वाढले आहे. ही पॅलेस्टाईन अरबांची संघटना असून आतापर्यंत इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची सूत्रधार मानली जाते. इस्रायलही हमासला प्रत्युत्तर देऊन ती डोक्यावर बसणार नाही याची दक्षता घेतो.
आतापर्यंतची युद्धे…

ड प्रथम युद्ध 1948
इस्रालयची अधिकृत स्थापना 15 मे 1948 या दिवशी झाल्याचे मानले जाते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी इजिप्त, जॉर्डन, इराक, सिरीया आणि लेबेनॉन यांनी या नवजात राष्ट्रावर एकत्र हल्ला चढविला. पण त्यांना इस्रायलमध्ये प्रवेश करणे शक्य झाले नाही. त्यांनी ज्यू राष्ट्राच्या अवतीभोवतीचा भाग आपल्या ताब्यात घेतला. इस्रायलच्या जन्मापूर्वीपासून तेथे असलेल्या ब्रिटीशांनी आपले सैन्य काढून घेतल्यानंतर अरब देशांनी पुन्हा हल्ले चढविले. तथापि, 1949 मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने पहिला शांती करार करण्यात आला.
ड दुसरे युद्ध 1956 :

इजिप्तच्या अध्यक्षपदी गमाल अब्देल नासर आल्यानंतर अरबांच्या इस्रायल संघर्षाला धार चढली. नासर यांनी सुवेझ कालव्याचे राष्ट्रीकरण केले. त्यामुळे युरोपियन देशांच्या दक्षिण अशियाशी होणाऱ्या व्यापारावर विपरीत परिणाम झाला. इस्रायलच्या जहाजांना सुवेझ बंद करण्यात आला. त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याशी करार करुन इस्रायलने इजिप्तशी युद्ध पुकारले. अवघ्या पाच दिवसांमध्ये या देशाने इजिप्तचा सायनाय हा प्रांत जिंकला. त्याशिवाय गाझा पट्टी, राफा आणि अल् अर्ष या भागांवरही नियंत्रण मिळविले. सुवेझवरही नियंत्रण मिळविण्याच्या तयारीत इस्रायल असताना फ्रान्स आणि ब्रिटनने इजिप्तशी करार करुन युद्ध थांबविले. नंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेने सूत्रे घेतली.
ड तिसरे युद्ध 1967 :

हे युद्ध जून 5 ते 10 या कालावधीत झाले. प्रथम सिरीयाने सीमावर्ती भागांमधील खेड्यांना लक्ष्य केले. नंतर पुन्हा इजिप्तने हल्ला चढविला. तथापि इस्रायलने तिखट प्रत्युत्तर देऊन इजिप्तची मिग विमाने पाडविली. तसेच आपल्या अवती-भोवनीच्या सर्व अरब देशांवर एकाचवेळी द्रुतगती हल्ले करुन त्यांना जेरीस आणले. इजिप्तचे संपूर्ण विमानदल नष्ट करण्यात आले. या युद्धात इस्रायलने सिरीयाचा गोलन टेकड्यांचा भाग जिंकून आपले सामरिक स्थान भक्कम केले. या युद्धात अरबांचा मोठा पराभव झाला होता.
चौथे युद्ध 1973 :

हे युद्ध ‘व्योम किप्पूर’ युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. ज्यू धमिंयांचा सर्वात मोठा सण व्योम किप्पूर हा आहे. त्याच दिवशी पश्चिमेकडून इज्प्ति आणि उत्तरेकडून सिरीयाने बेसावध इस्रायली सैन्यावर अचानक हल्ला केला. या युद्धात प्रारंभी इस्रायलला माघार घ्यावी लागली होती आणि काही प्रदेश गमवावा लागला होता. इजिप्तच्या सैन्याने पूर्वीपेक्षा अधिक तयारीने हल्ला केला. तथापि, तिसऱ्या दिवसापासून इस्रायलने दोन्ही देशांच्या सैन्यांना मागे हटविले. आपला गमावलेला भाग पुन्हा मिळविला. शिवाय वेस्ट बँकचाही भाग जिंकला. सुएझ ओलांडून इजिप्तच्या सैन्याची केंडी केली. आजही वेस्ट बँकवर इस्रायलचे नियंत्रण असून हे युद्ध या देशाच्या पराक्रमाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते.
पाचवे युद्ध 1982 :

इस्रालयने बैरुट आणि सिरियाच्या काही भागांवर विमान हल्ले केले. लेबेनॉनच्या दक्षिण भागावरही जोरदार बाँबवर्षाव करण्यात आला. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) या संघटनेची अनेक स्थाने नष्ट करण्यात आली. नंतर शांती करार करण्यात येऊन बैरुटमधून माघार घेण्यात आली. या युद्धातही इस्रायलने आणखी भूभाग जिंकून विस्तार केला.
सहावे युद्ध 2006 : लेबेनॉनमधींल हिजबुल संघटनेने अनेक हल्ले केले. मागच्या युद्धात इस्रायलने पडकलेले हजारो सैनिक सोडविण्यासाठी दबाव आणण्यात आला. इस्रायलचे अनेक सैनिक मारले गेले. पण नंतर प्रत्युत्तरात हिजबुलचे मोठे नुकसान झाले हे युद्ध सर्वाधिक काळ म्हणजे 34 दिवस चालले. यात लेबेनॉनचे हजाराहून अधिक सैनिक मारले जाऊन लाखो नागरीक बेघर झाले. प्रथमच अनेक अरब राष्ट्रांनी हिजबुलची संघर्ष वाढविण्यासाठी निर्भर्त्सना केली.
कँप डेव्हिड करार
ड अमेरिकेतील कँप डेव्हीड या स्थानाचा इस्रायल-अरब संघर्षाशी जवळचा संबंध आहे. जवळपास प्रत्येक युद्धानंतर याच स्थानी इस्रायल आणि अरब देश यांनी शांतता करार केले आहेत. ते कँप डेव्हीड करार म्हणून ओळखले जातात. हे करार करतानाही इस्रायलने आपले वर्चस्व कसे राहील, याची दक्षता घेतलेली दिसून येते. अलिकडच्या काळात संघर्ष वरकरणी होत नसले तरी आतून वातावरण धुमसत असल्याचे ताज्या संघर्षावरुन स्पष्टपणे दिसून येत आहे.
पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना

ड प्रत्यक्ष युद्धात इस्रायलला नमवणे अशक्य आहे, याचा अनुभव आल्याने अरब देशांनी दहशतवादाच्या माध्यमातून संघर्ष चालविला आहे. यासाठी त्यांनी पॅलेस्टाईनमधील पीएलओ आणि हमास यांच्या साहाय्य केल्याचा आरोप केला जातो. 1982 च्या आधी पीएलओ ही संघटना आघाडीवर होती. तथापि, ती पुरेशी जहाल नाही असा आरोप होता. त्यामुळे नंतर हमास या अतिजहाल संघटनेचा जोर वाढला. पॅलेस्टाईन नेते यासीर अराफत यांच्या मृत्यूनंतर पीएओचा प्रभाव पूर्णपणे संपला असून आता हमास प्रामुख्याने आघाडीवर आहे.
दहशतवादी संघटनांचे नवे तंत्र
ड इस्रायली नागरी वस्त्यांवर ह्ल्ले करुन दबाव आणण्याचे हे तंत्र आहे. यासाठी प्रत्यक्ष युद्ध न करता, पॅलेस्टाईनमधून इस्रायलच्या नागरी वस्त्यांवर अग्निबाणांचा मारा केला जातो. हे अग्निबाण फारसे आधुनिक नसतात. तसेच ते अचूकपणे विशिष्ट लक्ष्यावर सोडण्याची यंत्रणाही हमासकडे नाही. त्यामुळे इस्रायलमध्ये हे अग्निबाण जेथे पडतील तेथे पडतील अशा पद्धतीने सोडले जातात. या तंत्राचा उद्देश इस्रायल जिंकण्याचा नसून त्याचा शक्य तितका रक्तपात घडवून आणणे हा आहे. पाकिस्तान भारताच्या विरोधात जे तंत्र उपयोगात आणतो, ते हेच तंत्र आहे. हिजबुल या संघटनेचाही इस्रालयाने जवळपास पाडाव केला आहे.
ताज्या संघर्षाचे कारण काय….
ड 2006 नंतर प्रथमच इस्रालय आणि हमास किंवा अरब संघटना यांच्यात युद्ध होत आहे. हमासने इस्रायलवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला असून अचानकपणे 7 हजारांहून अधिक अग्निबाण एकाच वेळी डागले आहेत. तसेच प्रथमच हमासच्या हस्तकांनी इस्रायलच्या काही सीमाचौक्यांवर हल्ला केला असून काही प्रमाणात त्या देशाच्या सैनिकांना माघार घ्यावयास लावली आहे. त्यामुळे इस्रालयाने लगोलग युद्धाची घोषणा करुन प्रत्युत्तराची पूर्ण तयारी केलेली दिसते. हमासला नष्ट करण्याच्या हेतूनेच इस्रायल प्रत्युत्तर देईल हे निश्चित असल्याने हा संघर्ष मोठा होईल, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
या युद्धाचे भवितव्य…
ड आतापर्यंत इस्रायल आणि अरब युद्धे पाच ते सहा दिवसांमध्ये संपली आहेत. एकच युद्ध महिन्यापेक्षा अधिक काळ चालले. शिवाय ताजे हे दोन किंवा अधिक देशांमधील युद्ध नसून ते इस्रालय विरुद्ध एक दहशतवादी संघटना असे असल्याने ते अधिक काळ चालणार नाही, अशी अटकळ आहे.
ड युव्रेन युद्धाशी याची तुलना होऊ शकत नाही. ते युद्ध वर्षभर चालले असून त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. तसा या संघर्षाचा होण्याची शक्यता कमी आहे. काही दिवसांपूर्वी अझरबैजान भागातही युद्ध होऊन नोबोर्नो काराबाख ताब्यात घेण्यात आले होते. पण त्या संघर्षाचा जगावर परिणाम झाला नाही. तशीच या युद्धाचीही स्थिती असेल असे तज्ञांचे मत आहे.
ड सध्या सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात मैत्री घडविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हमास संघटनेला सौदी अरेबियाचे गुप्त साहाय्य अधिक प्रमाणात आहे, असे बोलले जाते. या संघर्षातही सौदी अरेबियाची भूमिका आहे, असे उघड झाल्यास इस्रायलशी मैत्रीचे सुरु असलेले प्रयत्न प्रभावित होऊ शकतात.
ड युद्ध लांबल्यास किंवा ते अन्य देशांपर्यंत पसरल्यास कच्च्या तेलाच्या दरावर परिणाम होईल, अशी चिंता तज्ञा व्यक्त करतात. पण तशी वेळ त्वरित येणार नाही. तोपर्यंत अमेरिका किंवा अन्य देश मधस्थीं करुन संघर्ष आटोक्यात आणण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. नेमके काय होणार, हे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
माहिती संकलक -महादेव दात्ये









