अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचा निर्वाळा, अमेरिकेतील वृत्तपत्राने केला गौप्यस्फोट
@ वॉशिग्टन / वृत्तसंस्था
जगभर दोन वर्षे धुमाकूळ घातलेला कोरोनाचा विषाणू चीनमधूनच सर्वत्र पसरला होता, असा गौप्यस्फोट अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तसंस्थेने अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या निष्कर्षाच्या आधारे केला आहे. त्यामुळे या हाहाकाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या चीनच जबाबदार आहे, ही बाब आता स्पष्ट होत आहे.
कोरोनाचा विषाणू चीनच्या वुहान येथील एक जैवतांत्रिक प्रयोगशाळेतून निसटला. त्यानंतर प्रथम चीनमध्ये आणि नंतर सर्व जगात तो पसरला. चीनने हे हेतुपुरस्सर पेले की ते त्याच्याही ध्यानीमनी नसताना झाले, यावर मोठा खल होण्याची शक्यता आहे. सार्स कोव्हीड 2 हा विषाणू कोरोनाच्या विविध प्रकारांचा मूळ विषाणू मानला जातो. त्याची निर्मिती चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेतच झाली आहे, याविषयी आता पूर्ण निश्चिती झाली आहे, असा अहवाल अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने सादर केला आहे, असे या वृत्तसंस्थेने स्पष्ट केले आहे.
हुनान बाजारपेठ उत्तरदायी
मध्य चीनमधील वुहान या शहराच्या हुनान बाजारपेठेत या विषाणूचे केंद्र होते. तेथून तो प्रथम वुहान शहराच्या विविध लोकवस्त्यांमध्ये पसरला. त्यानंतर चिनी प्रवाशांचा माध्यमातून तो जगात सर्वदूर पसरला. 2019 या वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये हा विषाणू प्रथम चीनच्या मोठय़ा शहरांमध्ये आणि नंतर तेथून जगात पसरला. नंतर या विषाणूमध्ये आणखी उत्क्रांती होऊन त्याचे विविध प्रकार तयार झाले. तेही कालांतराने जगाच्या विविध देशांमध्ये संक्रमित झाले. मात्र, प्रारंभ निश्चितपणे चीनमध्येच झाला आहे, असे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाला त्याच्या विविध अभ्यासांमधून आढळले आहे. हा अहवाल अमेरिकेच्या प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. आता त्यावर विचार केला जाणार आहे.
गुप्तचरांनी शोधले मूळ
अमेरिका तसेच अन्य काही देशांच्या गुप्तचर संस्थांनी कोरोनाचे मूळ नेमके कोठे आहे, हे शोधून काढण्यात यश मिळविले आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार वुहानच्या प्रयोगशाळांमधून कोरोना विषाणू अपघाताने बाहेर निसटला आहे. हे हेतुपुरस्सर करण्यात आल्याचे आढळून आलेले नाही. तथापि, या प्रयोगशाळांनी जीं दक्षता घेणे आवश्यक होते, ती घेतली गेली नव्हती, असेही संशोधनात आढळले आहे, असे बोलले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ही चीनची जबाबदारी ठरते, असेही मत अनेक तज्ञांनी या अहवालावर व्यक्त केले आहे.
उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग
हे संशोधन करण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थानी उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. या संदर्भात अमेरिकेच्या ऊर्जा विभागाला मोठा अनुभव असून या विभागाजवळ या संबंधातील तांत्रिक कौशल्यही विपुल प्रमाणात आहे. तसेच अन्य देशांमध्ये या विभागाचे नेटवर्कही प्रबळ आहे. या नेटवर्ककडून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
काही संस्थांचा विरोधी अहवाल
काही गुप्तचर संस्थानी कोरोच्या विषाणूच्या मूलस्थानाविषयी निश्चित माहिती मिळू शकत नाही, असाही निष्कर्ष काढला आहे. हा विषाणू चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळांमधूनच बाहेर पडलेला आहे, असे विश्वासार्ह पद्धतीने दर्शविणारा पुरावा हाती आलेला नाही. त्यामुळे तसा निष्कर्ष केवळ अपुऱया पुराव्यांवर काढणे योग्य नाही, असे या गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र अहवाल दिला आहे. तरीही सर्वसाधारण चीन हेच मूळ आहे या निष्कर्षाचे बहुमत दिसून येते. तसेच प्रथम या विषाणूचा उद्रेक चीनमध्येच झाल्याचे अगदी स्पष्ट आहे. तेथूनच तो जगात इतरत्र पसरला हे देखील उघड आहे. त्यामुळे सर्वसाधारण निष्कर्ष चीन हेच या विषाणूचे मूलस्थान आहे, हे दर्शविणारा असल्याचे स्पष्ट होत आहे.
सर्वसाधारण एकमत…
ड कोरोना विषाणू चीनमध्येच तयार झाला यावर सर्वसाधारण एकमत
ड विविध गुप्तचर संस्थांच्या अभ्यासातून विविध बाबी झाल्यात स्पष्ट
ड काही गुप्तचर संस्थांच्या मते मात्र, उगमस्थान अद्याप समजले नाही









