‘आप’सह 20 हून अधिक पक्षनेत्यांची उपस्थिती शक्य
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, बेंगळूर
पुढील वर्षी देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांची पुन्हा एकदा सोमवार, 17 जुलै आणि मंगळवार, 18 जुलै रोजी बेंगळूरमध्ये बैठक होत आहे. त्यात 20 हून अधिक पक्ष सहभागी होण्याची शक्मयता आहे. या बैठकीसाठी आता काँग्रेसने पुढाकार घेतला असून विविध राजकीय पक्षांना आमंत्रित करण्यासाठी पत्रव्यवहारही केला आहे. या बैठकीला हायकमांड सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी काँग्रेसतर्फे सर्व पक्षांच्या नेत्यांना डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीच्या निमित्ताने बेंगळूरमध्ये ठिकठिकाणी पक्षनेत्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे फ्लेक्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 23 जून रोजी पाटणा येथे पहिली बैठक बोलावली होती. या बैठकीत दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगबाबत केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल आम आदमी पक्षाच्या बैठकीत नाराजी होती. अध्यादेशाला काँग्रेसने पाठिंबा दिला नाही तर दुसऱ्या सभेला हजर राहणार नाही, अशी भूमिका अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केली होती. मात्र, आता काँग्रेसने आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी नेते उपस्थित राहणार आहेत. आम आदमी पक्ष विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे रविवारी, आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी पक्षाच्या राजकीय घडामोडींच्या बैठकीनंतर स्पष्ट केले. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष 17-18 जुलै रोजी बेंगळूर येथे समविचारी पक्षांच्या बैठकीत सहभागी होईल, असेही ते म्हणाले.
पाटणा येथे झालेल्या बैठकीत 17 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी विरोधी गट आणखी मजबूत करण्यासाठी अन्य 8 पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये एमडीएमके, केडीएमके, विदुथलाई चिऊथाईगल काची (व्हीसीके), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लीम लीग, केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि केरळ काँग्रेस (मणी) यांचा समावेश आहे. या नवीन पक्षांपैकी केडीएमके आणि एमडीएमके हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मित्र होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना पुढील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे.









