ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोण येत नसतो. सत्ता ज्या दिवशी येते, त्याच दिवशी ती जाण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे सत्ता टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असतं. कारण विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्षच हारत असतो, अशा शब्दात राज ठाकरे यांनी नाव न घेता भाजपला टोला लगावला.
पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी पत्रकारांवर होणारे हल्ले आणि राजकीय दबावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. पत्रकारांवरील हल्ले निषेधार्ह आहेत. आम्हालासुद्धा त्याचा राग आहे. पूर्वी पत्रकारांसाठी लढणाऱ्या भाजपच्या सत्तेच्या काळातच पत्रकारांवर बंधने लादली जात आहेत, ही चिंताजनक बाब आहे. भाजपने त्यांचा इतिहास एकदा उलगडून पाहावा. प्रत्येकाचा एक काळ असतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती जायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असतं.
पत्रकारांबद्दल बोलताना ते म्हणाले, उत्तम काम करणारे अनेक पत्रकार आहेत. मात्र राजकारणाची भाषा घसरली आहे. राजकारणातील अनेक नेते पातळी सोडून बोलतात. कारण तुम्ही त्यांना दाखवता. तुम्ही माध्यमांनी दक्षता घ्यावी. मागचा पुढचा अभ्यास नसतो, इतिहास माहित नसतो. त्यामुळे मी काहींना उत्तर देतच नाही. ग्रामीण महाराष्ट्रात पत्रकार परिषदा घेऊच नये, असं वाटतं. कारण त्यांच्याकडे प्रश्नच नसतात. सध्या याला काय वाटतं? त्याला काय वाटत? तेच चालू आहे. वृत्तवाहिन्यांवर तेच सुरू आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.








