पी. चिदंबरम यांची टिप्पणी, एकत्र राहणे आवश्यक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निर्माण केलेली आघाडी आता विखुरताना दिसत आहे. पुढची लोकसभा निवडणूक अद्याप लांब आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या आघाडीला आतापासूनच तडे जाताना दिसत आहेत, अशी व्यथा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे.
येथील एका कार्यक्रमात ते आपले विचार व्यक्त करीत होते. विरोधी पक्षांच्या आघाडीच्या एकात्मतेसंबंधी त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये शंका उपस्थित केली. ही आघाडी सध्या पूर्णांशाने अस्तित्वात आहे, असे दिसत नाही. मी सध्या आघाडीत कार्यरत नसल्याने मला नेमकी परिस्थिती माहिती नाही. तथापि, जे दिसत आहे, ते सकारात्मक नाही. ही आघाडी आजही पूर्णपणे एकात्म असेल तर मला आनंदच होईल. मात्र, सध्यातील आघाडीच्या संदर्भात अशी स्थिती पहावयास मिळत नाही, अशी भाषा त्यांनी या कार्यक्रमात आघाडीच्या ऐक्यासंबंधी केली.
भाजपच्या यंत्रणेची प्रशंसा
केवळ विरोधी पक्ष आघाडीच्या एकात्मतेसंबंधी संयश व्यक्त करुन चिदंबरम थांबले नाहीत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या यंत्रणेचीही प्रशंसा केली. एक प्रबळ यंत्रणा असणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी विरोधकांना दोन हात करायचे असतील, तर त्यांनाही बळकट होण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक विभागात भक्कम आहे. कोणताही विरोधी पक्ष आज या पक्षाइतका बळकट नाही. विरोधी पक्षांच्या एकात्म कार्यातूनच हे बळ त्यांना प्राप्त होऊ शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हाती आयते कोलित लागले आहे. चिदंबरम यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीची शोकांतिकाच मांडली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने चिदंबरम यांच्या विधानांचा आधार घेऊन केली आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही
विरोधी पक्षांसाठी अजूनही वेळ गेलेली नाही. लोकसभा निवडणूक लांब आहे. विरोधी पक्षांना पुन्हा एकत्रित येण्यासाठी पुरेसा वेळ आहे. या वेळेचा त्यांनी सदुपयोग केला तर, त्यांना एकात्म पद्धतीने काम करणे शक्य होणार आहे. विरोधी पक्षांनी आपासातील मतभेद विसरुन आणि क्षुद्र व्यक्तीगत महत्वाकांक्षांना थारा न देता, एका ध्येयासाठी झगडण्याचे ठरविल्यास त्यांना कोणतेही आव्हान कठीण जाणार नाही, अशा अर्थाचे विधानही यावेळी चिदंबरम यांनी केले.
भाजपकडून खिल्ली
भारतीय जनता पक्षाने लगोलग चिदंबरम यांच्या विधान उचलून विरोधी पक्षांवर टीका करण्यास प्रारंभ केला आहे. चिदंबरम यांनी विरोधी पक्षांच्या तथाकथित आघाडीचे खरे चित्र लोकांसमोर मांडले. काँग्रेसचा एक मान्यवर आणि ज्येष्ठ नेता जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या बळकटपणाचे कौतुक करतो, तेव्हा साऱ्या टीकाकारांची तोंडे बंद होतात. चिदंबरम यांनी साऱ्या देशासमोर जे सत्य मांडले, त्यासाठी त्यांची प्रशंसा केली पाहिजे. त्यांचा परखडपणा कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचीही अशीच अवस्था
भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप भंडारी यांनी टीका करताना काँग्रेसचीही अवस्था यापेक्षा वेगळी नसल्याचे प्रतिपादन केले. काँग्रेसचे भवितव्य अंध:कारमय आहे, याची जाणीव आता त्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना होऊ लागली आहे. परिणामी, त्यांनी तशा प्रकारचे संकेत देण्यास प्रारंभ केलेला दिसून येतो. शशी थरुर यांच्या पाठोपाठ आता चिदंबरम यांच्याही विश्वासाला तडा गेलेला दिसतो. चिदंबरम हे राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी विरोध पक्षांच्या ऐक्यासंबंधी अशी मते व्यक्त करावी, यातूनच परिस्थिती किती बिकट आहे, हे सर्वांना समजल्याशिवाय रहात नाही, अशी टीका भंडारी यांनी केली आहे. या पक्षाचे नेते राजीव चंद्रशेखर यांनीही चिदंबरम यांची विधानांचे समर्थन केले आहे.









