25 कोटी हस्तगत : 100 कोटीची करफसवणूक उघड
वृत्तसंस्था /कानपूर
उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये ज्वेलर्स, रियल इस्टेट व्यावसायिकांच्या ठिकाणांवर 4 दिवसांपासून प्राप्तिकर विभागाची सुरू असलेली कारवाई मंगळवारी संपुष्टात आली आहे. 300 अधिकाऱ्यांनी 95 तास चाललेल्या छाप्यांमध्ये 600 कोटी रुपयांचे बोगस व्यवहार शोधून काढले आहेत. तर ज्वेलर्सच्या ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांदरम्यान 25 कोटी रुपये रोख तर सुमारे 70 किलो सोने-चांदी जप्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळपर्यंत 16 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. यानंतर एका बंद दुकानात मोठ्या प्रमाणात रक्कम असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे तेथे केलेल्या कारवाईत एका गाठोड्यात 9 कोटी रुपयांची रोकड हस्तगत झाली. उत्तरप्रदेशात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सद्वारे झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने केला आहे. प्राप्तिकर विभागाने 50 हून अधिक निनावी मालमत्तांचे दस्तऐवज प्राप्त केले आहेत. तसेच 100 कोटी रुपयांची करफसवणूकही उघड झाली आहे.









