नरेंद्र मोदी स्टेडियमवर 4 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन : 10 संघांचे कर्णधारही राहणार उपस्थित
वृत्तसंस्था/ मुंबई
यंदाच्या वर्ल्डकपचे यजमानपद भारताला मिळाले असून त्याची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. याआधी 4 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. आयसीसीने हा दिवस आयसीसी कॅप्टन डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या रंगतदार कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स सहभागी होणार असून या दिवशी सर्व 10 संघांचे कर्णधारही तेथे उपस्थित राहणार आहेत. विश्वचषकापूर्वी 3 ऑक्टोबरला शेवटचा सराव सामना खेळवला जाणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना होईल.
विश्वचषक स्पर्धेतील सराव सामने 3 ऑक्टोबरला संपणार आहेत. सराव सामने संपल्यानंतर सर्व कर्णधार अहमदाबादमध्ये जमतील. सर्व प्रसारमाध्यमांशी संवाद साधून फोटो काढणार आहेत. हा दिवस ‘कॅप्टन डे‘ म्हणून ओळखला जाणार आहे. यानंतर सायंकाळी सर्व कर्णधार उद्घाटन समारंभात सहभागी होतील. उद्घाटन समारंभात भारतीय संस्कृती आणि सभ्यतेनुसार कार्यक्रम आयोजित केले जातील. यावेळी आयसीसीचे सदस्य आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, अन्य बोर्डाच्या सदस्यांना देखील निमंत्रण पाठवले असून ते ही यावेळी उपस्थित असतील.
विशेष म्हणजे, प्रथमच भारत वर्ल्डकपचे स्वतंत्ररित्या आयोजन करत असल्याने बीसीसीआयकडून यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. हा कार्यक्रम खास करण्यासाठी बीसीसीआयचे अनेक पदाधिकारी यामध्ये व्यस्त आहेत. जगभरातून अनेक मान्यवर यासाठी उपस्थित राहणार असून यासाठी विशेष तयारी सुरु असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय संघाची जय्यत तयारी
वर्ल्डकप स्पर्धेआधी टीम इंडिया आशिया चषक व ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. 30 ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू सध्या एनसीए मध्ये सराव करत आहे. सर्व खेळाडूंची यो-यो टेस्ट देखील झाली असून केएल राहुल वगळत सर्व खेळाडू फिट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 28 रोजी सायंकाळी श्रीलंकेला रवाना होणार आहे. वर्ल्डकपच्या आधी ही मोठी स्पर्धा होत आहे. याशिवाय, वर्ल्डकपसाठी संघ निवड झाली नसल्याने आशिया चषकामध्ये खेळाडूंच्या कामगिरीकडे बीसीसीआयचे लक्ष असणार आहे.
10 शहरांमध्ये सामने होणार
विश्वचषक स्पर्धेत एकूण 58 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये 10 सराव सामन्यांचा समावेश आहे. तसेच वर्ल्डकपमधील सामने भारतातील 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम व हैदराबाद येथे सराव सामने होणार आहेत.









