वृत्तसंस्था /पोश्चेस्ट्रूम (दक्षिण आफ्रिका)
भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यातील दक्षिण आफ्रिका अ संघा बरोबरची 4 दिवसांची एकमेव कसोटी अनिर्णीत अवस्थेत राहिली. या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिका अ संघातर्फे जेन डू प्लेसीसने शानदार शतक झळकविले तर रुबिन हर्मनचे शतक 5 धावांनी हुकले. भारत अ च्या डावामध्ये प्रदोष रंजन पॉलने शानदार शतक तर सर्फराज खान आणि शार्दुल ठाकुर यांनी अर्धशतके झळकविली. या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाचा पहिला डाव 98.1 षटकात 319 धावात आटोपला. भारत अ संघातील वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने 43 धावात 5 तर सौरभ कुमारने 83 धावात 3 गडी बाद केले. कवीरप्पा आणि शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. त्यानंतर भारत अ संघाने पहिल्या डावात 86.5 षटकात 417 धावा जमवित दक्षिण आफ्रिका अ संघावर 98 धावांची आघाडी मिळविली. प्रदोष रंजन पॉलने 209 चेंडूत 1 षटकार आणि 23 चौकारांसह 163, सर्फराज खानने 1 षटकार आणि 7 चौकारांसह 68, शार्दुल ठाकुरने 2 षटकार 9 चौकारांसह 76, देवदत्त पडिकलने 6 चौकारांसह 30, सौरभ कुमारने 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिका अ संघातर्फे जोन्सने 100 धावांत 4, प्लेजीने 65 धावांत 3 तसेच बॉश्चने 46 धावांत 2 गडी बाद केले. 98 धावांनी पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिका अ संघाने दुसऱ्या डावात 42 षटकात 2 बाद 152 धावा जमवित भारत अ संघावर 54 धावांची आघाडी मिळविली असताना खेळ समाप्त झाला. दक्षिण आफ्रिका अ संघातर्फे सलामीच्या व्हॅलीने 8 चौकारांसह नाबाद 72 तर जेन डू प्लेसेसने 5 चौकारांसह नाबाद 50 धावा जमविल्या. तुषार देशपांडे आणि सौरभ कुमार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – दक्षिण आफ्रिका अ -प. डाव 98.1 षटकात सर्वबाद 319 (डू प्लेसीस 106, हेर्मन 95, प्रसिद्ध कृष्णा 5-43, सौरभ कुमार 3-83), भारत अ प. डाव 86.5 षटकात सर्वबाद 417 (प्रदोष रंजन पॉल 143, सर्फराज खान 68, शार्दुल ठाकुर 76, पडिकल 30, सौरभ कुमार 22, जोन्स 4-100, प्लेटी 3-65,बॉश्च 2-46), दक्षिण आफ्रिका अ दु. डाव 42 षटकात 2 बाद 152 (व्हॅली नाबाद 72, डू प्लेसीस नाबाद 50, देशपांडे आणि सौरभ कुमार प्रत्येकी 1 बळी).









