मंत्री सतीश जारकीहोळी यांची परखड टीका : काँग्रेस भवनात पत्रकार परिषद
बेळगाव : काँग्रेस सरकारने किती चांगली कामे केली तरी भाजपने त्याला विरोध करणे हे स्वाभाविक आहे. आणखीन अडीच वर्षे काँग्रेस सरकारवर टीका, आरोप होतच राहणार आहे. विरोध करणे एवढेच भाजप नेत्यांना माहित आहे, अशी परखड टीका सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. येथील काँग्रेस भवनात मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्येष्ठ लेखिका बानू मुस्ताक यांना म्हैसूर दसरा उत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन होणार असून हा एक योग्य विचार आहे. त्यांच्या कार्याचा आदर करण्याच्या उद्देशाने सरकारने निमंत्रित केले आहे. यामध्ये कोणतेही राजकारण किंवा धर्माबद्दल विचार करणे योग्य नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांसाठी जिल्हाधिकारी प्रसादाची व्यवस्था करणार आहेत. चांगले काम करीत असताना कोणाला घाबरण्याचे कारण नाही.
बेळगावात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
कोट्यावधी रुपये खर्चून बेळगावात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. डॉक्टरांची नेमणूक व उर्वरित कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण करून नागरिकांना सोयीचे करून देण्यात येईल. पुढील महिन्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन होईल, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धर्मस्थळ प्रकरणासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचा कोणताही सहभाग नाही. त्यामुळे सरकारवर टीका करणे चुकीचे आहे.
गोकाकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज
शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने बीडीसीसी बँक व हुक्केरी विद्युत सहकारी संघाची निवडणूक लढवित आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये कोणतेही राजकारण नाही. गोकाकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले असून गोकाक शहरासह परिसरातील तालुक्याच्या विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. लवकरच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री जारकीहोळी यांनी दिली. पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे मुख्य सचिव सुनील हणमण्णवर, ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, बसवराज शिगाव्वी, सिद्दीकी अंकलगी आदी उपस्थित होते.









