1400 वर्षांपासून सांभाळतेय एकच कुटुंब
हॉटेल उद्योग हा अत्यंत जुना आहे. ऐतिहासिक शहर पॅरिस आणि रोममध्ये क्लासिक प्रॉपर्टीज आहेत, तर जपानमध्ये एक रिसॉर्ट आहे, जे अनेक शतकांपासून सातत्याने लोकांना स्वत:ची सेवा देत आहे. 705 साली सुरू झालेले जपानी रिसॉर्ट ‘निशियामा ओनसेन केयुनकन’ माउंट फूजीपासून काही अंतरावर आहे. हे हॉटेल पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने अधिकृतपणे याला जगातील सर्वात जुने सेवेत असलेले हॉटेल म्हणून मान्यता दिली आहे. 705 साली फुजिवारा मोइतो यांनी या रिसॉर्टची स्थापना केली होती. तेव्हापासून त्यांचे कुटुंब आतिथ्य उद्योगात कार्यरत आहे. लोकांच्या गरजेनुसार मागील काही वर्षांमध्ये रिसॉर्टमध्ये आधुनिकीकरण आणि देखभाल होत आहे. तरीही रिसॉर्टमध्ये पारंपारिक गोष्टी दिसून येतात.

हॉटेलचे मुख्य आकर्षण उष्ण झरे आणि आल्हाददायक नैसर्गिक दृश्यं आहेत. ऐतिहासिक समुराईपासून प्रसिद्ध व्यक्ती आणि राजकारणी लोक याचा इतिहास आणि तसेच हीलिंग वॉटरसाठी रिसॉर्टमध्ये येत असतात. केयुनकनचा प्रसिद्ध बाथ ‘मोचितानी नो यू’मध्ये थेट उष्ण झऱ्यातून पाणी येते. येथे येणारे लोक थेट झऱ्यांमधून येणारे पाणी पित असतात. रिसॉर्टचे वैशिष्ट्याच याला उर्वरित हॉटेल्सपासून वेगळी ओळख मिळवून देते.
‘निशियामा ओनसेन केयुनकन’मध्ये 37 खोल्या आहेत. सर्व पारंपरिक जपानी शैलीत सजविण्यात आल्या आहेत. येथे एक रात्री वास्तव्यासाठी 38 हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. जगातील सर्वात जुन्या हॉटेलमध्ये ओपन-एअर बाथ घेण्याचीही व्यवस्था आहे. यादरम्यान तुम्ही पर्वत अन् जंगलाच्या दृश्याचा आनंद घेऊ शकता.
14 शतके जुन्या या रिसॉर्टच्या एका बाजूला सुंदर नदी वाहते. तर रिसॉर्टच्या दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल आहे. जंगलाचे दृश्य हॉटेलच्या प्रत्येक खोलीच्या खिडकीतून दिसून येते. फुजिवारा मोइतो यांची 52 वी पिढी या सुंदर रिसॉर्टचे व्यवस्थापन सांभाळत आहे. त्यांचे उत्तम आतिथ्य आणि उत्तम ठिकाणामुळे जगभरातून लोक येथे येत असतात.









