नवे वर्ष उगवले, की सर्वप्रथम घरातील भिंतीवर टांगलेली मागच्या वर्षीची दिनदर्शिका काढून तिच्या स्थानी नवी दिनदर्शिका लावली जाणे, हा प्रत्येक वर्षीचा उपक्रम आहे. जवळपास प्रत्येक घरात तो पुर्तावला जातोच. खरे तर वर्ष संपायला एक-दोन आठवडे उरले की आपण नवी दिनदर्शिका विकत घेण्याच्या मागे लागतो. अनेक भिन्न भिन्न दिनदर्शिका आज बाजारात उपलब्ध आहेत. काही दिनदर्शिका अनेक दशकांपासून प्रसिद्ध आहेत. तथापि, त्यांच्यापैकी सर्वात जुनी कोणती असेल, हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेशातील जबलपूर येथे प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका भारतातील सर्वात जुनी आहे, असे मानले जाते. ही दिनदर्शिका लाला रामस्वरुप रामनारायण आणि बंधू या कंपनीची असून ती गेल्या 91 वर्षांपासून प्रसिद्ध केली जात आहे. 1934 मध्ये ही दिनदर्शिका प्रथम बाजारात आली. तेव्हापासून आजवर ती प्रत्येक वर्षी प्रसिद्ध केली जाते. दिनदर्शिकांच्या मुद्रणाचा प्रारंभ होण्याच्या आधी पंचांगे उपयोगात आणली जात असत. आजही पंचांगे उपलब्ध आहेत. पण पंचांग हे दिनदर्शिकेप्रमाणे सहजगत्या पाहता येत नाही. त्याचे एक वेगळे शास्त्र आहे. कित्येकांना ते अवगत नसते आणि ते माहीत करुन घेण्याइतका वेळ नसतो. त्यामुळे गेल्या 50-60 वर्षांपासून दिनदर्शिका लोकप्रिय झाल्या आहेत. जबलपूरची ही दिनदर्शिका गेली 9 दशके आपली लोकप्रियता राखून आहे. भारतात जवळपास प्रत्येक राज्यात ती उपलब्ध आहेच. तसेच तिने देशाच्या सीमाही ओलांडल्या असून ती अनेक देशांमध्ये आता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लाला रामस्वरुप रामनारायण आणि बंधू ही कंपनी गेल्या तीन पिढ्यांपासून अग्रवाल कुटुंब चालवत आहे.
इंग्रजांच्या काळात इंग्रजी कॅलेंडरे उपलब्ध असत. तथापि, त्या कॅलेंडरांमध्ये भारतीय सण आणि त्यांच्या तिथी इत्यादी माहिती नसे. त्यामुळे लोकांना पंचागांवर अवलंबून रहावे लागे. लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी, पंचांगातील सर्व माहिती असणारी, पण ती सुलभपणे प्रत्येक दिवशी कुटुंबातील सर्वांना पाहता येईल, अशी दिनदशर्शिका या कुटुंबाने निर्माण केली. तेव्हापासून ती साऱ्या देशात लोकप्रिय आहे, अशी माहिती या दिनदर्शिकेचे संपादक कैलाश अग्रवाल देतात. पंचांगांमधील संस्कृत शब्द कित्येकांना समजत नसत. त्यामुळे प्रचलित भाषेत पंचांगातील माहिती देण्यासाठी ही दिनदर्शिका निर्माण करण्यात आली आहे.









