वयाच्या 86 व्या वर्षीही करतेय नोकरी
जगात अनेक लोकांना स्वतःची नोकरी अत्यंत आवडत असते. परंतु असेही लोक आहेत, जे केवळ नाईलाज म्हणून नोकरी करतात. अशा लोकांना स्वतःच्या कामावर प्रेम नसते. परंतु जेव्हा जॉबवर प्रेम होते, तेव्हा तो करण्यास मजा वाटू लागते. स्वतःच्या जॉबवर अशाचप्रकारे पेम करणाऱया बेट्टे नॅश यांनी विश्वविक्रम केला आहे. पेशाने एअरहोस्टेस (हवाईसुंदरी) असणाऱया बेट्टे यांनी जगातील सर्वात वृद्ध एअरहोस्टेस होण्याचा मान मिळविला आहे.
86 वर्षीय बेट्टे यांचे नाव मागील आठवडय़ात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नेंद झाले आहे. त्या दीर्घकाळापासून अमेरिकन एअरलाइन्समध्ये कार्यरत आहेत. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील 65 वर्षे एअरहोस्टेस म्हणून घालविली आहेत. बेट्टे या मूळच्या मॅसाच्युसेट्स येथील रहिवासी आहेत. त्यांनी 1957 मध्ये एअरहोस्टेस म्हणून स्वतःच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्याच वर्षी पहिला उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला होता.

ओळखतात बहुतांश प्रवासी
बेट्टे यांनी एअरहोस्टेस म्हणून प्रदीर्घ काळ काम केल्याने बहुतांश प्रवासी त्यांना ओळखू लागले आहेत. एअरलाइन्स बेट्टे यांना स्वतःच्या पसंतीचा हवाईमार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य देते. परंतु त्या नेहमीच न्यूयॉर्क-बोस्टन-वॉशिंग्टन डीसी मार्गाचीच निवड करतात. यामागील कारण आहे त्यांचा मुलगा. या मार्गावर गेल्याने त्या दररात्री स्वतःच्या घरी जाऊ शकतात, तेथे त्यांचा मुलगा प्रतीक्षा करत असतो. बेट्टे यांचा मुलगा दिव्यांग असून केअरटेकर त्याची देखभाल करत असतात.
नव्या एअरहोस्टेसना सल्ला
बेट्टे यांनी एअरलाइन्सशी जोडल्या जाणाऱया नव्या फ्लाइट अटेंडेंट्सना अनेक सूचना केल्या आहेत. बेट्टे यांच्यानुसार माणुसकीला या जॉबमध्ये प्राथमिकता असायला हवी. जोपर्यंत मी तंदुरुस्त आहे तोपर्यंत काम करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बेट्टे यांना या विश्वविक्रमामुळे मोठी लोकप्रियता प्राप्त झाली आहे.









