पेन्शनचा बहाणा : सांबरा परिसरात खळबळ
वार्ताहर/सांबरा
मुतगे येथील वृद्धेची बँकेतील पेन्शन काढून देण्याच्या बहाण्याने लिफ्ट देऊन निर्जनस्थळी घेऊन जाऊन सोन्याची कर्णफुले व रोख रक्कम भामट्याने लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सांबरा येथे उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, मुतगे येथील उमाक्का रामचंद्र केदार (वय 71) या मुतग्याजवळील पेट्रोलपंपासमोर काकडी विकतात. मंगळवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे काकडी घेऊन विक्रीसाठी रस्त्याशेजारी बसल्या होत्या.
त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या भामट्याने काकडी खरेदी करण्याच्या बहाण्याने ओळख करून घेतली. बोलता बोलता तुमची पेन्शन जमा झाली आहे काढून घ्या, मी पण सांबऱ्याकडे जात आहे. वाटल्यास तुम्हाला जाताना बँकेकडे सोडून जातो असे सांगितले. पेन्शनबद्दल बोलल्यावर उमाक्कांना खरे वाटले. भामट्याने वृद्धेला दुचाकीवर बसवून घेऊन सांबऱ्याकडे निघाला व सांबरा-बसरीकट्टी मार्गावर निर्जनस्थळी घेऊन जाऊन उमाक्का यांच्या कानातील कर्णफुले, गळ्यातील यल्लम्मा टाळी व रोख रक्कम काढून घेतली. त्या वृद्धेला तेथेच सोडून त्याने पलायन केले.
घटनेनंतर उमाक्का या कशाबशा एअरपोर्ट क्रॉसपर्यंत चालत आल्या. तेथील स्थानिक रहिवाशांना घटनेची माहिती दिली. लागलीच स्थानिक रहिवाशांनी उमाक्कांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी मारिहाळ पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली आहे. मारिहाळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून अनेक सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. या घटनेने पूर्व भागात एकच खळबळ माजली असून शहर-तालुक्यात चोऱ्या व दरोड्यांचे सत्र सुरू असताना ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









