सुधाकर काशीद,कोल्हापूर
जुन्या राजवाड्यातील भवानी देवीच्या मंदिराचा चौक आज सुरांच्या लयीत अधिकच खुलला.एरव्ही भाविकांच्या लगबगीने भरलेल्या या चौकाला आज सुरांची आणि तीही चक्क शास्त्राrय संगीत सुरांची साथ लाभली. आणि राजार्षि शाहू महाराज यांच्या जीवन प्रवासाला किती अनोखे पैलु होते याची सुराच्या माध्यमातुन प्रचिती आली.
शाहू महाराज म्हणजे सामाजिक सुधारणांचा अविष्कार.त्यांची शिक्षण ,मल्लविद्या,शिकार ,यातली आवड वेगळीच.पण या रांगड्या शैलीच्या लोकाभिमुख राजाला शास्त्रीय संगीतातही रुची होती.आणि त्याच शास्त्रीय संगीताचे सुर आज भवानी मंडपात उमटले. शाहू महाराज आणि शास्त्रीय संगीत! ते कसे काय? असे मनात येणाऱ्यांना या सुरांनी खिळवून ठेवले.
कोल्हापुरात जुन्या राजवाड्याचे खूप वेगळेपण आहे.छत्रपती शिवाजी महाराज,शिवरायांच्या सुनबाई महाराणी ताराराणी यांचे तख्त (बैठक)आजही येथे आहे.1857 च्या सशस्त्र क्रांतीचा साक्षिदार हा वाडा आहे.सात चौकाचा हा वाडा कोल्हापूर संस्थानातील विविध घडामोडींचाही हा वाडा साक्षिदार आहे.वाड्याच्या सातही चौकात दगडी कारंजे होते.शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप काही वेगळे काम करून राजा कसा असावा याचे उदाहरण घालून दिले.त्यांनी शिक्षण मोफत व सक्तीचे केले.दवाखाने काढले.विद्यार्थी वसतीगृहे सुरु केली.मस्तवाल हत्तीला अंगावर घेण्राया साहसी साठमारीची उभारणी केली.पण जुन्या राजवाड्यात एक दालन आहे.ते शास्त्रीय सुर व संगीताचे आहे.राजार्षि शाहूना शास्त्रीय संगीता बद्दलची रुचीही कशी होती याचे प्रतिक हे दालन आहे.शाहूंच्या नावाने रेल्वे स्टेशन आहे.मेडिकल कॉलेज आहे.पण शाहू संगीत विद्यालय या नावाने शास्त्रीय सुर व संगीताचे दालन एक दोन वर्षे नव्हे तब्बल 108 वर्षे झाली आहे.
अधिक वाचण्यासाठी- ‘मन की बात’ मध्ये कोल्हापूरच्या राजू मोरे यांच्या उपक्रमाचा गौरव
भवानी मंदिरात जातानाच उजव्या हाताला हे दालन आहे.तेथे अतिशय अल्प मोबदल्यात गायन तबला हार्मोनियम शिकण्याची सुविधा आहे.आपल्या राज्यातील लोक सर्व शास्रीय कलांशीही जोडले गेले जावेत यासाठी शाहू राजांनी केलेली ती सोय आहे.आलिकडच्या काळात त्याची फारशी ओळख नव्या पिढीला नसेल.पण या शाहू संगीत विद्यालयाने शाहूंचे ऋण आजही जपले आहे.शाहू जयंती 26जुनला.त्यामुळे त्यांनी आज शास्त्रीय सुर व संगीताची स्पर्धा भरवली.आणि अख्या जुन्या राजवाड्याच्या विविध दालनात या सुरांच्या तरंगाने शाहुंची स्मृतीच जागवली.









