स्वच्छतेअभावी परिसरात दुर्गंधी : दारूच्या बाटल्यांचा खच्च : स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय
बेळगाव : रिसालदार गल्ली येथील महानगरपालिकेचे जुने कार्यालय मद्यपींचा अ•ा बनला आहे. कार्यालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या खोल्या मोकळ्या असल्याने त्या ठिकाणी मद्यपींची सोय होत आहे. ठिकठिकाणी टेट्रा पॅक व बाटल्यांचा खच पडला आहे. अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तर स्वच्छतागृहाअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील अनेक घटनांची साक्षीदार असणाऱ्या जुन्या महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये सध्या तालुका तहसीलदारांचे कार्यालय आहे. या ठिकाणी विविध सरकारी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कायम असते. सध्या गृहलक्ष्मी योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथील बेळगाव वन कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. तहसीलदार कार्यालय असून देखील या परिसरातील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. कार्यालयातील कचरा स्वच्छतागृहांच्या परिसरात टाकण्यात आला आहे. कचऱ्याची उचल न झाल्यामुळे व पावसामुळे कचरा कुजून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतागृहे बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
मागील बाजुला मोकळ्या खोल्या आहेत. त्या खोल्यांना दरवाजा असून कुलूप लावण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळी मद्यपिंसाठी सोयीचे ठिकाण बनले आहे. मद्य पिऊन टाकण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, टेट्रा पॅक, काचेच्या बाटल्यांचा खच पडला आहे. येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.









