काटे बायणा येथील खळबळजक घटना : सुमारे 35 लाखांचा ऐवज केला लंपास
प्रतिनिधी /वास्को
काटे बायणा भागातील एका नागरिकाचा खून झालेल्या अवस्थेत रविवारी रात्री मृतदेह आढळून आला. हा खून सोन्याच्या चोरीपायी झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून हा खून कुणी केला हे मात्र, सोमवारी रात्री उशिरापर्यंत उघडकीस आले नव्हते. मयताचे नाव कायतान उर्फ कासी डिसोजा (60) असे असून त्याच्याच राहत्या घरात त्याचा खून झाला आहे. या घटनेमुळे रविवारी रात्री बायणा भागात खळबळ उडाली. घरातून 15 लाखांचे दागिने आणि सुमारे 20 लाख रुपये रोख लंपास करण्यात आल्याचा अंदाज आहे.
या खून प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार खुनाची ही घटना रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास उघडकीस आली. कायतान डिसोजा हे आपल्याच मोगाबाई येथील घरात रक्ताच्या थारोळय़ात पडले होते. कायतान डिसोजा हे मूळ बार चालवणारे एक व्यवसायिक असून त्यांचा हा व्यवसाय त्यांची पत्नी सांभाळते. काटे बायणातच असलेला आपला बार बंद करून रात्री साडे अकराच्या सुमारास घरी पोहोचलेल्या पत्नीला आपला पती रक्ताच्या थारोळय़ात पडल्याचे दिसल्याने खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर शेजारी पाजारी एकत्र आले. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनीही रात्री घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
खुनाच्या घटनेमुळे बायणात खळबळ
ही माहिती मिळताच मुरगावचे पोलीस निरीक्षक राघोबा कामत तसेच वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक हेसुध्दा आपल्या पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात आणि पाहणीत हा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचे दिसून आलेले असून या निष्कर्षाबरोबरच पोलीस या खूनाचा सर्व दृष्टीकोनातून तपास करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील खूनी कोण याचा शोध लावण्याचा प्रयत्न जारी ठेवला आहे. पोलिसांना धागा सापडलेला आहे. मात्र, संशयित आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणाने काटे बायणा भागात खळबळ माजली आहे.
चोरीच्या उद्धेशानेच खून झाल्याचा संशय
पोलिसांनी कायतान डिसोजा याचा मृतदेह पंचनाम्यानंतर सोमवारी पहाटे शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. मयताच्या डोक्यावर वार करून त्याला ठार करण्यात आलेले आहे. त्याच्या शरीरावर अन्य कुठेही जखमा आढळून आलेल्या नाहीत. हा खून नेमका कोणत्या वेळेत झाला याचा उलगडा शवविच्छेदनानंतर उघड होणार आहे. मात्र, स्थानिक लोक आणि पोलीस सुत्रानुसार हा खून सायंकाळच्या वेळी घडला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कायतानचा खून कुणी केला, हे गुलदस्त्यात आहे.
रविवारी रात्री कायतान पत्नीला घरी न्यायला बारवर आलाच नाही
स्थानिक लोकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार कायतान हा बायणातील व्यवसायिक असल्याने त्याला सर्व स्थानिक लोक ओळखत होते. बार व्यवसाय आता पत्नीच सांभाळत होती. त्यामुळे ती दिवसातील बहुतेक वेळ बारमध्ये असायची. कायतान घरी किंवा बाहेरील कामात असायचा. त्याची पत्नी कायतान घरी असताना संध्याकाळी साडे चारच्या सुमारास बारवर गेली होती. मयत कायतान रोज रात्री तिला आणायला बारवर जात होते. परंतु रविवारी रात्री कायतान आपल्याला न्यायला आला नसल्याने पत्नी विचारात पडली होती. अखेर ती घरी आल्यावर खरा प्रकार उघडकीस आला. मयताला तीन मुली असून हल्लीच एकीचे लग्न झाले आहे. तिन्ही मुली विदेशात असतात. मयत कायतान काही वर्षापासून व्याजाने पैसे देत होता अशी चर्चाही लोकांमध्ये आहे. त्याला अंगावर दागिने घालायचीही हौस होती. त्याच्या घरात मोठी रोकड असावी व दागिनेही मोठय़ा संख्येने असावेत व लाखोंचा हा ऐवज लुटण्यासाठीच सर्व काही हेरलेल्या व्यक्तीने कायतानचा खून केला असावा अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. मयताला अन्य काही शौक होता का याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.
कायतानबरोबर फिरणारा अज्ञात युवक कोण?
या खून प्रकरणाशी जुळत असलेला एक महत्वाचा दुवा म्हणजे मयत कायतान सोबत तीन चार दिवसांपासून एक युवक फिरत होता. लोकांनी त्या दोघांना बायणात फिरताना पाहिले होते. मात्र, तो युवक कोण याबाबत कुणाला काहीही माहिती नाही. त्या युवकाला राहण्यासाठी कुणी तरी खोली द्यावी म्हणून कायतान काही लोकांकडे बोलला होता. मात्र, व्यक्ती अनोळखी असल्याने त्याला खोली देण्याचे काहींनी नाकारले होते अशी माहिती मिळते. ती व्यक्ती कोण व त्याचे आणि कायतानचे कसले संबंध होते. कायतान त्याच्या संपर्कात कसा आला याचा तपास पोलीस करीत आहेत. तो युवक आता गायब झालेला आहे. त्या अज्ञात युवकाला घेऊन कायतान काही ठिकाणी फिरला होता. त्यामुळे त्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवायचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.









