संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन सादर
खानापूर : कर्नाटक माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेंगळूर येथे शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच माध्यमिक आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली. कर्नाटक माध्यमिक शाळा आणि कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, शिक्षक नेमणुकीवरील निर्बंध तातडीने हटवण्यात यावेत, सातवे वेतन आयोग लागू करण्यासाठी तातडीने क्रम घेण्यात यावा, तसेच 1995 पासून ज्या शाळा आणि महाविद्यालये विनाअनुदान तत्त्वावर चालत आहेत. त्यांना तातडीने अनुदान मंजूर करावे, तसेच सरकारी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, अनुदाने आणि विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात, तसेच माध्यमिक आणि महाविद्यालयांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची मर्यादा पन्नासच करण्यात यावी, त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल. यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष एस. एस. मठद, सलीम कित्तूर, एम. ए. कोरुशेट्टी, पी. पी. बेळगावकर, एस. ए. सांद्रे, सी. एम. मेळवणगी, पी. डी. पाटील, एस. ए. कागे यांचा समावेश होता.









