म. ए. समितीचे आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री सीमासमन्वय मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. पाटण येथे झालेल्या या भेटी दरम्यान सीमाभागातील आरोग्य यंत्रणेवरून उद्भवलेल्या वादाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच म. ए. समितीचे आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी सीमासमन्वय मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिनोळी गावांमध्ये तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केल्यास सीमाभागातील मराठी भाषिकांना सोयीचे ठरणार असल्याची मागणी समन्वयमंत्र्यांकडे करण्यात आली. आपण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी समितीच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी नेते रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण-पाटील, महादेव पाटील, सागर पाटील, आर. एम. चौगुले यासह इतर उपस्थित होते.









