एक लाखाला प्रत्येक महिन्याला 20 हजाराचे दाखविले आमिष : 2 कोटीहून अधिक रक्कम गुंतवण्यात आल्याचे समोर
बेळगाव : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पुणे येथील युवकाला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. हुक्केरी, निपाणीसह बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातील गुंतवणूकदारांना सुमारे 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा चुना लावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सागर बापूसा निचिते (वय 35) रा. पुणे असे त्याचे नाव आहे. जिल्हा सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला चार दिवस पोलीस कोठडीत घेऊन चौकशी केली. सागरवर महाराष्ट्रातही फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याचे समजते. जानेवारीमध्ये जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात पुणे येथील ‘ईन कॅपिटल’ या मार्केटिंग कंपनीवर एफआयआर दाखल करण्यात आले होते. हुक्केरी, निपाणी परिसरातील अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीत भरमसाट परताव्याच्या आमिषाने गुंतवणूक केली होती. गुंतवणूकदारांना परतावा मिळाला नाही. म्हणून त्यांनी जिल्हा सीईएन विभागात एफआयआर दाखल केला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या परवानगीने सागरला चार दिवस पोलीस कोठडीत घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुणेसह महाराष्ट्रातील विविध भागात यासंबंधी चौकशी करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार ईन कॅपिटल ही कंपनी पुण्याची आहे. बारामती येथील राजेंद्र जगताप व नितीन गायकवाड हेही कंपनीच्या संस्थापकांपैकी आहेत. या कंपनीत एक लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर पुढील दहा महिने दरमहा 20 हजार रुपये देण्याचे सांगण्यात आले होते. प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये रिफंड व दहा हजार रुपये लाभ असे एकूण 20 हजार रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. हुक्केरी परिसरात या कंपनीचे मोठे जाळे आहे. निपाणी परिसरातील गुंतवणूकदारांनीही गुंतवणूक केली आहे. दरमहा बैठकाही व्हायच्या. सुमारे 2 कोटी रुपयांहून अधिक रक्कम या कंपनीत गुंतवण्यात आल्याचे सामोरे आले आहे. सध्या सागरची चौकशी केली असून इतर संचालकांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.v जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करणाऱ्या हुक्केरी परिसरातील लक्ष्मण, कपिल, विनायक, कुमार, प्रभाकर आदींचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.









