टिळकवाडीतील ‘त्या’ मिळकतींबाबत संभ्रम नको : मनपाची मालकी असली तरी सर्व अधिकार कब्जेदारालाच असणार
बेळगाव : टिळकवाडी येथील काही भाग हा निरंतर पट्ट्यामध्ये येतो. या जागेचे मालक म्हणून महानगरपालिकेचे नाव नमूद असले तरी त्या जागेचा कब्जेदार हा मूळ मालकच आहे. त्यामुळे कब्जेदारांनी निर्धास्त रहावे. कोणत्याही परिस्थितीत टिळकवाडीतील या जागांवर मनपाची मालकी असणार नाही, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कायदेतज्ञांनीही स्पष्ट केले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, टिळकवाडीतील मिळकतींवर मनपाची मालकी, अशा आशयाचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाले आणि टिळकवाडीतील नागरिकांमध्ये खळबळ पसरली. या वृत्तामुळे नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला. आपण खरेदी केलेल्या जागेवर मनपा कसा हक्क सांगू शकते? असा प्रश्न निर्माण झाला. मात्र हा भाग निरंतर पट्टा या कक्षेत असल्याने महानगरपालिकेचे नाव नमूद आहे. परंतु त्या जागेचा कब्जेदार हा मूळ मालक आहे, असे स्पष्टीकरण तज्ञांनी दिले. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ही मिळकत निरंतर पट्ट्याने दिली असल्याने त्यावर महापालिकेचे नाव राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. टिळकवाडीचा काही भाग इंग्रजांनीच लेआऊट केला होता. त्यानंतर बेळगाव मुन्सिपल ब्युरोकडे हस्तांतरीत करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नगरपालिका अस्तित्वात आली. 1969 साली नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. त्यामध्ये इंदिरा खाडे या नगराध्यक्षा झाल्या. त्यावेळीही या जमिनीची नोंद निरंतर पट्टा असल्यामुळे नगरपालिकेचेच नाव त्या उताऱ्यांवर राहिले आहे.
बेळगाव महानगरपालिका 1977 ला अस्तित्वात आली. त्यानंतर 1983 साली महापालिकेची पहिली निवडणूक झाली. त्यामध्ये पहिले महापौर म्हणून सुभाष जाधव हे निवडून आले. तेव्हाही निरंतर पट्टा अशीच या जमिनीची नोंद होती. मात्र मूळ कब्जेदार हे त्या जागेवरील मालमत्तेचे कब्जेदारच होते आणि आहेत. यापुढेही ते राहणारच आहेत. सध्या महापालिकेमध्ये नव्याने खातेबदल होत असले तरी त्याचा यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे वकिलांनी स्पष्ट केले. निरंतर पट्टा असा उल्लेख करण्यामागचा उद्देश म्हणजे त्यावेळी खरेदी करण्यासाठी निर्माण झालेली कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी ती पळवाट होती. कायद्याच्या चौकटीत त्याची नोंद केली पाहिजे. जोपर्यंत आपण त्याठिकाणी राहतो तोपर्यंत त्या जागेचा सर्व अधिकार कब्जेदाराला दिला आहे. त्यामुळे महापालिकेचे जरी नाव असले तरी त्याच्या खाली कब्जेदाराच्या नावाची नोंद केलेली असते. या परिसरातील अनेक मालमत्तांवर अनेकांनी राष्ट्रीयीकृत बँकांमधून कर्जे काढली, विक्री केली, काहीजणांनी खरेदी केली, त्या सर्वांची नावे त्यावर दाखल होतात. एका चौकटीमध्ये मुन्सिपालटी अशी नोंद असे कायमच राहणार आहे. त्यासाठी नवीन कायदा तयार करून ते नाव कमी केले पाहिजे, असे यावेळी वकिलांनी बोलताना सांगितले.
घाबरण्याचे काहीच कारण नाही
जागा विक्री करताना ती तुकडा पद्धतीने विक्री करणे त्यावेळीही बंदी होती. त्यामुळे कायद्यातून पळवाट शोधून त्याची खरेदी-विक्री केली जात होती. निरंतर पट्टा लिहून देताना मोबदल्याची पूर्ण रक्कम नजराणा स्वरुपात घेतली जात होती व नाममात्र वार्षिक भूभाडे ठरविले जात होते. निरंतर पट्टा असल्यामुळे ते कायद्यानेच मान्य आहे. टिळकवाडीतील सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, शुक्रवारपेठ, रॉय रोड, रानडे रोड, महर्षी रोड, नेहरु रोड यासह शहरातील कॉलेज रोड, अंबाभुवनजवळील मुजावर गल्ली, गोंधळी गल्ली परिसरातदेखील निरंतर पट्टा असल्याची नोंद आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. शहरातील अनेक जमिनींची निरंतर पट्टा अशी नोंद आहे. अजूनही काही जणांच्या उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे. मात्र ती जागा ही निरंतर पट्ट्याने घेतलेल्या व्यक्तीच्या नावे नोंद असते. त्यामुळे कब्जेदार हाच त्या जागेचा मालक असतो. अनेकांना वतन देण्यात आले होते. त्यांनी देखील जमिनी विक्री केल्या आहेत. त्या उताऱ्यावरदेखील पूर्वीच्या वतनदारांचीच नावे आहेत. नावे आहेत. म्हणून त्यांना जमीन परत घेता येणार नाही. याबाबत अनेक खटलेदेखील न्यायालयात दाखल झाले होते. मात्र ते कब्जेदाराच्या बाजूनेच निकालात लागले आहेत. त्यामुळे काहीच घाबरण्याचे कारण नसल्याच्या प्रतिक्रिया वकिलांतून व्यक्त होत आहेत.
घाबरू नका, मालमत्ता तुमचीच – अॅड. अमृत कोल्हटकर
टिळकवाडीच नाही तर शहरातील अनेक भागांमध्ये निरंतर पट्टा, अशी नोंद आहे. त्यांची कागदपत्रे ही पूर्वीच्या मालकांच्या नावानेच आहेत. मात्र ती निरंतर पट्ट्याने जागा दिली गेली आहे. निरंतर पट्टा जागा खरेदी केल्यामुळे संपूर्ण अधिकार हे कब्जेदारालाच आहेत. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. तर तुमची मालमत्ता ही तुमचीच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
निरंतर पट्ट्यामुळे मनपाचे नाव – अॅड. नागेश सातेरी
निरंतर पट्टा असल्यामुळे महापालिकेच्या नावाचा उल्लेख येणारच आहे. मात्र महापालिकेचे नाव असल्यामुळे जाणूनबुजून महापालिकेचे अधिकारी त्रास देण्याची शक्यता आहे. असे असले तरी मूळ कब्जेदारच त्या जागेचा मालक असतो. सर्व अधिकार त्यांनाच असतात. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. यासाठी आता एक कायदा करून ती जागा संबंधितांच्या नावे दाखल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.









