संचालक मंडळासमोर नवी आव्हाने : शेतकऱ्यांच्या हितासाठी अचूक व्यवस्थापन करणे आवश्यक
वार्ताहर/काकती
यंदा येथील मार्कंडेय साखर कारखान्याच्या ऊस गाळपाचे अधिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात नूतन संचालक मंडळाची कसोटी लागणार आहे. यासाठी नूतन संचालक मंडळाचे अथक प्रयत्न हवेत. यावरच संचालक मंडळाची प्रतिष्ठा भागधारक सभासदांसमोर टिकून राहणार आहे. याकडे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. मार्कंडेय साखर कारखान्याला आर्थिक सुबत्ता आणि कारखाना चालवण्यासाठी खेळत्या भांडवलाची उणीव होती. बँकांमधील कर्जे, इथेनॉल प्रकल्प, सहवीज योजना असे प्रकल्प राबविल्याशिवाय कारखाना व शेतकरी सभासदांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता येणार नाही, याकरिता सत्ताधारी गटाचे प्रमुख शिलेदार अविनाश पोतदार यांना पंचवार्षिक निवडणुका लढवायची इच्छा नव्हती. मात्र या गटातील तानाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिवर्तनवादी विचारामुळे निवडणुकीला सामोरे जावे लागले. ‘शेतकरी बचाव पॅनल’च्या नावामुळे आणि ‘शेतकरी बचाव आणि कारखाना बचाव’ या नाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी तानाजी पाटील यांच्या गटाला उत्स्फूर्तपणे निवडून देऊन शेतकऱ्यांनी त्यांचे नूतन संचालक म्हणून जल्लोषात स्वागत केले आहे. ही कारखान्याच्या विश्वासार्हतेसाठी जमेची बाजू आहे. गेल्या तीन वर्षात सर्वप्रथम ऊस गाळप 2019-20 साली ट्रायल म्हणून करण्यात आली. 2020-21 मध्ये एक लाख 21 हजार मे. टन ऊस गाळप झाले. दुसऱ्या वर्षी 2021-22 साली 1 लाख 95 हजार 290 मे. टन, तिसऱ्या म्हणजे गेल्यावर्षी 1 लाख 72 हजार टन उसाचे गाळप झाले. यावर्षी तालुक्यातील ऊस उत्पादकांनी ऊस गाळपाला जादा दिल्याने वाहतूक खर्चाचा बोजा कमी झाला.
यावर्षी 5 लाख मे. टन ऊस गाळप झाल्यास फायदेशीर
यावर्षी तालुक्यात 1550 हेक्टरात नवीन उसाची लागवड झाली आहे. यामुळे सरासरी एकर उसाचे उत्पादन 45 ते 52 टनापर्यंत तर खोडवा उसाचे क्षेत्र 7692 हेक्टरात असून एकरी 38 ते 40 टनापर्यंत उत्पादन होणार आहे. यावर्षी अल्पसा पाऊस झाल्याने तालुक्यात सुक्या दुष्काळाची परिस्थिती आहे. परिणामी सरासरी टनात 10 टक्क्याने घट होणार आहे. अशा परिस्थितीतही किमान 9 लाख मे. टन उसाचे उत्पादन बेळगाव तालुक्यात होणार आहे. यापैकी 4 लाख मे. टन ते 5 लाख मे. टन ऊस मार्कंडेय कारखान्याला गाळपासाठी आणल्यास निश्चितपणे साखर कारखाना फायद्यात चालणार आहे. असे झाल्यास संचालक मंडळाला मागे वळून पहावे लागणार नाही. परंतु अचूक व्यवस्थापनाचे नियोजन ठरवून कामाला लागावे लागणार आहे. कारखान्यातील कामगार वर्ग, अधिकारी, वाहतूक व ऊस तोडवाल्याचे नियोजन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करावे लागणार आहे. प्रामुख्याने कारखान्याचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्या खांद्यावर सर्व जबाबदारी असून, संचालक मंडळाने निर्देशनाचे पालन करून अधिक ऊस गाळपासाठी पाठवण्याचा प्रयत्न केला तरच ‘शेतकरी बचाव, कारखाना बचाव’ होणार आहे. या यशाच्या क्षेत्रात संचालक मंडळाची प्रतिष्ठा अबाधित राहणार आहे.
गळीत हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू केल्यास लाभदायी
नूतन संचालक मंडळापुढे ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आव्हान उभे ठाकले आहे. गाळप अधिक करण्यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून गाळपाला सुरुवात होणे आवश्यक आहे. तालुक्याबाहेरील काही कारखाने 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगामाला सुरुवात करणार आहेत. त्याअगोदर मार्कंडेय साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाल्यास किमान 150 दिवस कारखाना चालल्यास 4 लाख मे.टन ते 5 लाख मे. टनपर्यंत गाळप उद्दिष्ट कारखाना गाठू शकेल. परिणामी निश्चितच कारखान्याला आर्थिक सुबत्ता येऊन कारखाना फायद्यात चालेल. शेतकऱ्यांचा बचाव होऊन कष्टकऱ्यांची गरिबी कमी होण्यास मदत होईल.









