छगन भुजबळाची नाराजी उघड , विजय शिवतारे संतापले, सुधीर मुनगंटीवाराचा आरोप : तिन्ही पक्षांमधील नाराजाचा सूर
नागपूर/ प्रतिनिधी
राज्यात प्रचंड बहुमताचा आकडा प्राप्त करुन सत्तेत आलेल्या महायुती सरकारने आपला शपथविधी घेण्यास जवळपास एक महिन्याचा कालावधी घेतला.मात्र हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात झाला. यावेळी महायुतीमधील ज्येष्ठ मंत्र्यांना टाळल्यामुळे आता नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी त्यांची नाराजी उघडपणे सादर करत ते नाशिकला रवाना झाले. तर शिदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपला संताप व्यक्त करत विरोध केला. भाजपचे माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर पक्षावरच आरोप केला आहे.
अजित पवारांच्या पक्षाने छगन भुजबळ आणि दिलीप वळसे -पाटील यांना स्थान दिले नाही .मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू असताना छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची बाजू लावून धरली होती. त्याचेच हे बक्षीस आहे का असे पत्रकारांनी विचारले असताना भुजबळ यांनी होकारार्थी उत्तर दिले. मला डावलले जाईल हे मला अपेक्षित नव्हते. महायुती सरकार येण्यामध्ये लाडकी बहीण आणि ओबीसी समाजाचा मोठा वाटा होता. सभागफहात दोन्ही बाजूंचे सदस्य अंगावर येत असतानाही ओबीसींची बाजू मी कायदेशीरपणे मांडली होती. थेट लढ्यात उतरलो होतो. जरांगे पाटील यांना अंगावर घेतले होते. या सगळ्याचा महायुतीला फायदा झाला असं निवडून आलेले आमदारही मान्य करतात, असे भुजबळ म्हणाले.
मी कधीच व्यथित होत नाही. : भुजबळ
मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष मला जे पद देतो, त्या पदासाठी मी काम करतो. मंत्रिमंडळात माझं नाव आहे, असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं. एवढाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना ते का काढण्यात आलं, ते मला माहित नाही. बाकी मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही. मी व्यथित नाही. कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून मी गोरगरिबांचे विषय मांडायचो. आता विधानसभेत मांडणार आहे.
नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांचा रास्ता रोको
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतफत्त्वातील महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. या विस्तारावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते नाराज आहेत, तशी जाहीर नाराजी त्यांनी माध्यमांसमोर स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. त्यानंतर आता भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी नाशिकमध्ये रास्तारोको आंदोलन केले आहे. नाशिक जिह्यातील छत्रपती संभाजी नगर‚नाशिक राज्य मार्गावरील विंचूर येथे भुजबळ समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली. या सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
मुनगंटीवार देखील नाराज
मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले आहे की, तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवली आहे, यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, हा मग तेच खरं..सर्व त्यांनाच माहित असणार आहे. माझे मंत्रिमंडळात नाव आहे, असे मला सांगण्यात आले होते, मात्र शपथविधी दिवशी माझे नाव नसल्याचे मला समजले. मात्र नाव का नव्हते ते काय मला समजले नसल्याचे म्हणत त्यांनी पक्षावरच आरोप करत नाराजी व्यक्त केली.
अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं तरी मी घेणार नाही : विजय शिवतारे
शिदे गटाचेन नेत विजय शिवतारे यांनी आपली नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, माझे शेवटपर्यंत नाव होते, अचानक कट झाले. त्यामुळे नाराजी निश्चित आहे. त्यामागची कारणमीमांसा मी पाहिली. महाराष्ट्रात कतफ&त्व, काम चालायचे, प्रातं चालायचे, विभागवार प्रतिनिधित्व द्यायचे. माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचं नाही. माझी कामे महत्त्वाची आहेत. मला लोकांनी निवडून दिलं आहे. विभागीय नेतफत्व दिलं जायचं.माझं नाव कट झाल्याबद्दल मला अजिबात दु:ख नाही. लोकांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे. ते न झाल्याने नाराजी शंभर टक्के आहे. अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं तरी मी घेणार नाही. माझ्या मतदारसंघातली कामे मुख्यमंत्र्यांकडून करून घेणे, एवढच आहे. मंत्रिपदाबद्दल मला राग नाही. वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे.
या आमदरांचे नाराजी नाट्या
राष्ट्रवादी : छगन भुजबळ ,अनिल पाटील
शिवसेना : नरेंद्र भोंडेकर ,तानाची सावंत, अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर ,विजय शिवतारे
भाजप : सुधीर मुनगंटीवार , रवींद्र चव्हाण, संजय कुटे, अतुल भातखळकर









