महिला-बालकल्याण खात्याचे उपसंचालक आर. नागराज यांची माहिती
बेळगाव : कायद्याबाबत जनजागृती करण्यात आल्यामुळे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत तक्रार नोंदविणाऱ्या महिला आणि मुलींची संख्या वाढली आहे. ज्या मुली आणि महिलांना अॅट्रॉसिटीचा सामना करावा लागला, त्यांना तक्रार करण्यासाठी पुढे येण्याइतके धाडस कायद्यामुळे मिळाले आहे. महिलांना व मुलींना सहजपणे तक्रारी नोंदविता याव्यात, यासाठी केंद्र सरकारच्या अनुदानातून ‘सखी’ हे वनस्टॉप सेंटर बिम्समध्ये सुरू करण्यात आले. या सेंटरमध्ये 2022-23 दरम्यान अॅट्रॉसिटीच्या 222 तक्रारी नोंदविल्या गेल्या. तर गेल्या सहा महिन्यांत 121 तक्रारी नोंदविल्या गेल्या. उपलब्ध आकडेवारीनुसार बलात्कार झाल्याच्या तक्रारींचे प्रमाणही वाढले आहे. 2022 मध्ये 64 तक्रारी नोंदविल्या गेल्या होत्या. पण सहा महिन्यांत 42 तक्रारी नोंदविल्या गेल्या.
तक्रार नोंदविण्यासाठी साहाय्य
सातत्याने जागृती केल्यामुळे आता महिला आणि मुली तक्रार करण्यासंदर्भात पुढे येत आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक आर. नागराज यांनी दिली. बिम्सच्या कक्षेत येणाऱ्या सखी सेंटरमध्ये पूजा पाटील या प्रशासक म्हणून काम पाहतात. तक्रारी घेऊन येणाऱ्या महिला व मुलींचे समुपदेशन केले जाते. त्यांना कायद्याची मदत दिली जाते आणि पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यासाठी साहाय्य केले जाते. याशिवाय पीडित महिला किंवा मुलीला तत्काळ 5 हजार रुपयांची मदत दिली जाते. पूर्वी तक्रारी नोंदविण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, जनजागृतीच्या कार्यक्रमांमुळे आता पीडितांची मानसिकता बदलली असून आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचे धाडस त्यांच्यामध्ये आले आहे.
चिकोडी येथे सखी सेंटर सुरू होणार
बेळगाव हा मोठा जिल्हा असून अथणी किंवा रायबाग अशा ठिकाणाहून तक्रार नोंदविण्यासाठी बेळगावला येणे महिलांना कठीण होत होते. परंतु, आता लवकरच चिकोडी येथे सखी सेंटर सुरू होणार आहे. त्यामुळे पीडित महिलांना त्वरित तक्रार नोंदविणे शक्य होणार आहे.
एप्रिल 2022-सप्टेंबर 2023 पर्यंतच्या तक्रारी
- कौटुंबिक हिंसाचार… 64
- बलात्कार …………….. 106
- लैंगिक गैरवर्तन…….. 14
- मुलांचा छळ…………. 10
- बालविवाह……………. 37
- बेपत्ता व अपहरण…. 68
- सायबर गुन्हे………… 4
- बर्न केस …………….. 2
- अन्य गुन्हे……………. 343









