लोणावळा : लोणावळा शहरातील पर्यटकांची संख्या घटली असल्याचे चित्र शनिवारी व रविवारी पहायला मिळाले. दिवसभर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच भुशी धरण व लायन्स पॉईंटकडे जाणाऱया मार्गावर वाहनांची संख्या अत्यल्प होती. तसेच पर्यटन स्थळांवर देखील पर्यटकांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. सहारा पुल धबधबा, भुशी धरण, लायन्स पॉईंट, राजमाची गार्डन, तुंगार्ली धरण यासह ग्रामीण भागामधील कार्ला एकवीरा देवी मंदिर व लेणी परिसर, भाजे लेणी व धबधबा, लोहगड किल्ला, पाटण धबधबा या सर्वच ठिकाणी दोन्ही पर्यटकांची गर्दी रोडावली असल्याचे पाहायला मिळाले.
15 ऑगस्ट रोजी लोणावळा शहर व ग्रामीण भागामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. त्या दिवशी शहरातील सर्व रस्ते व सर्व पर्यटन स्थळांवर पाय ठेवण्यास देखील जागा शिल्लक नव्हती. मात्र, त्यानंतर आलेल्या शनिवारी व रविवारी गर्दीमध्ये प्रचंड घट झाली असल्याचे पाहायला मिळाले. शहरातील चिक्कीची दुकाने देखील रिकामी होती. लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवार-रविवारची संभाव्य गर्दी ध्यानात घेतात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. परंतू, पर्यटकांची गर्दीच कमी असल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. खरंतर दरवर्षीच 15 ऑगस्ट नंतर लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाचा हंगाम कमी होत जातो. यावर्षी मात्र लवकरच गर्दी घटली आहे. लोणावळा शहरांमध्ये जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर ऑगस्ट महिन्यात अतिशय कमी पाऊस झाला आहे. यामुळे भुशी धरण व भाजे धबधबा यांच्या खाली असलेल्या पाय्रयांवरून वाहणारे पाणी कमी झाले आहे. सोबतच सहारा पुल धबधबा, पाटण धबधबा, लायन्स पॉईंट जवळील धबधबा यांचे पाणी देखील बंद झाल्याने पर्यटकांचा हिरमोड होऊ लागला आहे. या कारणांमुळे देखील लोणावळा व परिसरातील पर्यटक संख्या घटू लागली आहे. विशेष म्हणजे यावर्षी पोलीस प्रशासनाने कोणत्याही पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातली नव्हती. आज रविवारी लोणावळा परिसरात काही प्रमाणात पाऊस होत होता.








