कोल्हापूर :
काळानुसार घरातील प्रत्येक घरातील किचनचे चित्र बदलून गेले आहे. पूर्वी ‘घरोघरी मातीच्या चुली’ अशी म्हण होती. याप्रमाणे सर्वांच्या घरी मातीच्याच चुली असायच्या. आता चुलींचा वापर करायचा झाल्यास लाकडांचा तुटवडा आहे. आता या चुलींची जागा गॅस, इलेक्ट्रिक ओव्हनने घेतली आहे. याचा परिणाम शहरातील लाकूड वखारीवर झाला आहे. सद्यस्थितीत शहरातील अनेक लाकूड वखारी बंद झाल्या आहेत. या लाकूड वखारी आता नावापुरत्याच राहील्या आहेत. या वखारी तंदुरी भट्ट्यासाठी लागणाऱ्या कोळशासाठी व धार्मिक होमहवन व काही ठिकाणी बंबद्वारे पाणी तापवण्यासाठी लाकडांचा वापर होत आहे.
पूर्वी घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आता कालबाह्य झाली आहे. पूर्वी जेवण करण्यासाठी, पाणी तापवण्यासाठी मातीच्या चुली वा लोखंडी शेगड्यांचा वापर होत होता. यासाठी कोळसा, लाकूड व रॉकेलचा वापर होत होता. घरगुती इंधन म्हणून लाकूड कोळसा व रॉकेल ही उपलब्ध असे. एवढेच नव्हे तर रॉकेल, कोळसा हे दारात आणून घरपोच दिले जात होते. याचा दर सुध्दा नाममात्र होता.
स्वातंत्र्यपूर्वकाळात रॉकेल एक रुपयाला चार गॅलन (एक गॅलन पाच लिटर) तर कोळसा एक रुपयाला एक धडा तर लाकूड एक रुपये मण म्हणजे 40 किलो अशा दराने मिळत होते. पण आता काळानुसार लाकूड वखारीचे अस्तित्व कमी झाले आहे. इस्त्री दुकान, हॉटेलमधील तंदुरभट्टी यासाठीच याचा वापर होऊ लागला आहे. पण आता इस्त्री व तंदुरीभट्ट्याही या इलेक्ट्रीक झाल्याने लाकूड वखारीकडे या व्यावसायिकांनी पाठ फिरवली आहे.
- लाकूड वखारी कमी झाल्या
आता घरोघरी गॅस व ओव्हनचा वापर सुरू असल्याने तसेच इस्त्री दुकान व हॉटेलमध्ये इलेक्ट्रीकचा वापर सुरू झाल्याने, कोळशाचा वापर बंद झाला आहे. याचा परिणाम कोळसा वखारीवर झाला असुन याची संख्या कमी झाली आहे.
– रघुनाथ यादव, कोळसा वखार व्यापारी








