वाघाची संख्या 186 वरून 400
सोमवारी मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये कोल्हापुरात
सुधाकर काशीद,कोल्हापूर
महाराष्ट्रात 2010 साली वाघांची संख्या होती 180 म्हणजे महाराष्ट्रातील वनसंपदेच्या तुलनेत खूपच कमी. त्यावर्षीपासून वन विभागाने गांभीर्याने वाघांचे संरक्षण व जतन करण्याच्या दृष्टीने लक्ष घातले. आणि आज बरोबर बारा वर्षांनी महाराष्ट्रातील वाघांची संख्या दुप्पट म्हणजे 400 झाली आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या दृष्टीने वाघ संवर्धनाची ही कृती खूप अभिमानास्पद ठरली आहे. एवढेच काय, बिहार, राजस्थान व कंबोडिया येथून तेथील वन विभागाने वाघांच्या जोडय़ाची मागणी महाराष्ट्राकडे केली आहे.
महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांच्या अधिवासासाठी किंवा त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरही जंगल सुरक्षित रहावे यासाठी 15 कॉरिडॉर (राखीव संवर्धन) आहेत. आणखी बारा कॉरिडोर लवकरच घोषित होणार आहेत आणि 18 नवीन कॉरिडॉर शोधली जात आहेत. आज एखादा वाघ राधानगरीत दिसला तर तोच वाघ काही दिवसांनी कोयना परिसरातही दिसतो. म्हणजेच त्याच्या अधिवासाचा पट्टा राधानगरीपासून कोयनेपर्यंत आहे. त्यामुळे हा सारा जंगलाचा पट्टा राखीव संवर्धन म्हणून घोषित झाला आहे.
एखाद्या जंगलात पट्टेरी वाघ असणे, हे त्या जंगलाचे वैभव मानले जाते. किंबहुना एखाद्या जंगलात वाघ म्हणजे तेथे वन्यजीवांची जगण्याची अन्नसाखळी किंवा ते जंगल वन्यजीवांच्या दृष्टीने परिपूर्ण मानले जाते. ही अन्नसाखळी विस्कळीत झाली तर वाघांचा वावर नागरी वस्तीत जाणवायला लागतो.
महाराष्ट्रात ताडोबा अंधारी, पेंच नागपूर, मेळघाट अमरावती, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली कोल्हापूर, नवेगाव, नागझिरा, बोर हे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पात वाघांचे जतन व संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातात. या परिसरात वाघांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. वाघांच्या अधिवासावर विशेष लक्ष ठेवले जाते. वाघांची ये-जा कुठून कुठंपर्यंत? त्यांचे प्रजनन कोठे होते? त्यांच्या नैसर्गिक खाद्याची उपलब्धता याकडे लक्ष ठेवले जाते. जंगलातही तृणभक्ष्यी जनावरे वाढतील, यासाठी प्रयत्न केले जातात. जेणेकरून वाघांना त्यांच्या अधिवासातच भक्ष्य मिळवणे सोपे जाते.
वाघ हा राष्ट्रीय प्राणी.., त्याचा रुबाबही वेगळा. पण त्यामुळे वाघाच्या चोरटय़ा शिकारीतही शौर्य मानणाऱया काही घटकांमुळे वाघांची शिकार होते. वाघाचे कातडे, त्याच्या नखांना मोठी मागणी आहे. त्यामुळे चोरटय़ा शिकाऱयांची वाघाच्या अस्तित्वावरची भीती कायम आहे. या पार्श्वभूमीवर 2010 मध्ये महाराष्ट्रात वाघांची संख्या 186 होती. ती दहा वर्षात नियोजनपूर्वक जपण्याचा, वाढवण्याचा संकल्प करण्यात आला. आता 2022 मध्ये नुकत्याच घेतलेल्या आढाव्यात ही संख्या 400 झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. वाघांच्या या साया संवर्धनात कोल्हापूर जिह्यातील वनसंपदेचाही मोठा हातभार आहे.
टायगर कॉरीडॉर….
वाघांच्या नवीन होणाऱया 18 कॉरिडॉरमध्ये व नवीन कॉरिडॉरचे क्षेत्र शोधण्याच्या सुरू असलेल्या कार्यवाहीत कोल्हापूर जिह्यातले आणखी काही जंगल क्षेत्र वाघासाठी राखीव व संवर्धन घोषित होणार आहेत. यापूर्वी राधानगरी, तिलारी ते कोयना हा जंगल मार्ग वाघांसाठी राखीव व संवर्धित केला आहे.
चांगली कामगिरी…
महाराष्ट्रात वाघांची संख्या दुप्पट होणे हे शासन, वन विभाग व त्या त्या भागातील स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नाचे यश आहे. कोल्हापूर परिसरात राधानगरी, तिलारी ते पाटण कोयनेपर्यंत पट्टेरी वाघांचा वावर आहे. कोल्हापूर जिह्यातही वाघांचा वावर आहे. पण त्यांचे प्रजनन येथे व्हावे यासाठी प्रयत्न करावे लागतील.
सुनील लिमये,प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य.