वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय डाक (भारतीय पोस्ट) स्वतःच्या ग्राहकांना उत्तम सुविधा देण्यासाठी नवनव्या योजना तयार करत आहे. लोकांच्या घरांपर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्यासाठी प्रकल्प अन् तंत्रज्ञानावर पोस्ट विभाग काम करत आहे. तसेच भारतीय डाक विभाग चालू वर्षात 10 हजार नवी पोस्ट ऑफिसेस सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करत पोस्ट ऑफिसच्या आधुनिकीकरणासाठी विभागाला 5,200 कोटी रुपये दिले आहेत. गुजरातमध्ये आम्ही अलीकडेच ड्रोनच्या माध्यमातून डिलिव्हरी पूर्ण केली आहे. पोस्टाच्या अन् विविध सरकारी सेवा लवकरच लोकांना घरबसल्या मिळणार आहेत. लोकांना आता पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने सेवा त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविल्या जातील, अशी माहिती पोस्ट विभागाचे सचिव अमन शर्मा यांनी दिली आहे.
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच आता भविष्यातील मार्ग असणार आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करत नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोरोना महामारी काळात भारतीय पोस्ट विभागाने लोकांच्या घरांपर्यंत 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याची डिलिव्हरी केली आहे.
सरकारने अधिक पोस्ट ऑफिसेस सुरू करण्याची सूचना केली आहे. सध्या आणखी 10 हजार पोस्ट ऑफिस सुरू करण्याची अनुमती मिळाली आहे. लोकांना त्यांच्या घराच्या 5 किलोमीटरच्या कक्षेत बँकिंग अन् वित्तीय सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. 10 हजार पोस्ट ऑफिसची भर पडल्यावर देशातील एकूण पोस्ट ऑफिसची संख्या सुमारे 1.7 लाख होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









