2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खात्यांमध्ये जमा : 56 टक्के बँक खाती महिलांची
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गरिबांना बँकिंग सेवेशी जोडण्यासाठी 2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या जनधन खाते योजनेच्या अंतर्गत खातेधारकांची संख्या 50 कोटींहून अधिक झाली आहे. पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत 56 टक्के बँक खाती महिलांची उघडण्यात आली आहेत. तर 67 टक्के बँकखाती ग्रामीण आणि निमग्रामीण भागांमध्ये काढण्यात आली आहेत.
वित्तीय समावेशनासाठी राष्ट्रीय मोहिमेंतर्गत 28 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान जनधन योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेने आता 9 वर्षांचा टप्पा गाठला आहे. बँकांनी पुरविलेल्या डाटानुसार 9 ऑगस्ट 2023 पर्यंत जनधन खात्यांची संख्या वाढून 50 कोटीच्या पार गेली आहे. या खातेधारकांपैकी 34 कोटी खात्यांसाठी मोफत स्वरुपात रुपे कार्ड प्रदान करण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.
जनधन खात्यांमध्ये जमा रक्कम 2.03 लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. म्हणजेच प्रत्येक जनधन खात्यात सरासरी 4076 रुपये जमा आहेत. या 50 कोटीपैकी 5.5 कोटी खातेधारक डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरद्वारे शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
पंतप्रधान जनधन खात्यांनी देशाच्या वित्तीय क्षेत्रात बदल घडवून आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे. सध्या देशात प्रत्येक प्रौढाकडे स्वत:चे बँक खाते आहे. जनधन खातेधारकांना अनेक प्रकारचे लाभ दिले जातात. या योजनेच्या अंतर्गत खाते उघडणाऱ्यांना किमान रक्कम ठेवण्याची कुठलीच अनिवार्यता नाही. मोफत रुपे कार्डसोबत 2 लाख रुपयांचा दुर्घटना विम्याचा लाभ मिळतो. तसेच 1 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट सुविधाही मिळत असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले.









