पोलीस महासंचालकांनी घेतली विशेष बैठक
पणजी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड देण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरीही वाहन अपघात कमी झाल्याचे दिसून येत नाही. केवळ दंड ठोठावणे हाच पोलिसांचा उद्देश नसून वाहन अपघातांवर नियंत्रण येणे गरजेचे आहे. वाहन अपघातातील मृत्यूंची संख्याही वाढली आहे, असे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सांगितले. राज्य वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल सोमवारी विशेष बैठक झाली. त्यात वाहन अपघातात सातत्याने होणाऱ्या वाढीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. सिंग यांनी विविध कक्षांतर्गत वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा आढावा घेतला. वेळोवेळी दंड देऊनही युवकांचे वाहन चालवितानाचे रस्त्यावरील वर्तन सुधारत नसल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई करून अनेक चालकांना दंड ठोठावण्यात आला. दुचाकीचालक तसेच सह प्रवाशालाही दंड देण्यात येत असतानाही अपघातांच्या घटना वाढतच आहेत, ही चिंतेची बाब आहे, असेही सिंग म्हणाले.
वाहनचालकांचे बेशिस्त वर्तन
वाहनचालक परवाने देतानाचा हलगर्जीपणा तसेच राज्यातील ड्रायव्हिंग स्कूल योग्य रितीने प्रशिक्षण देत नसल्यामुळे अनेक युवक नियमांचे व्यवस्थित पालन करीत नाहीत तसेच त्यांचे वाहन चालवितानाचे वर्तन बेशिस्त आणि बेफिकीरपणाचे असते म्हणून वाहन अपघातांना निमंत्रण मिळते असे मत वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडले. अनेक स्कूलमध्ये पायाभूत सुविधाही नाहीत, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
घातक ठिकाणे सुधारण्याचे प्रयत्न
रस्ता सुरक्षेबाबत चांगले शिक्षण आवश्यक आहे, जे ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून दिले जावे. रस्त्यांवरील जी घातक आणि अपघातास कारणीभूत ठरणारी ठिकाणे आहेत, ती सुधारण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचे सार्वजनिक बांधकाम खात्याबरोबर काम सुरु आहे.
वाहतूक शैक्षणिक मोहिमेला गती द्यावी
वाहतूक नियम शैक्षणिक मोहिमेला आणखी गती देण्याचे निर्देश सिंग यांनी यावेळी वाहतूक पोलिसांना दिले. रस्ता सुरक्षेच्या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांनाही वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहिमेत जोडून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट सक्ती
राज्यातील वाढते अपघात आणि अपघातातील वाढत्या मृत्यूंच्या संख्येमुळे वाहतूक पोलीस विभागाने वाहतूक नियमांची कडक अमंलबजावणी करण्याचे ठरविले आहे. आता दुचाकीवरील सहप्रवाशाला हेल्मेट नसल्यास दुचाकी चालकाला एक हजार ऊपये दंड ठोठावण्यात येत असून त्याची अमंलबजावणीही सुऊ केली आहे. त्यामुळे दुचाकीवर वाटेत कुणाला घ्यायचे असल्यास अतिरिक्त हेल्मेट आहे की नाही याचा विचार करावा लागणार, अन्यथा एक हाजर ऊपये दंड भरावा लागणार आहे. वाहतूक कायदा 129 कलमानुसार दुचाकीवरील चालक व सहप्रवासी या दोघांनीही हेल्मेट परिधान करणे सक्तीचे आहे. आत्तापर्यंत गोव्यात या कायद्याला बगल देऊन केवळ दुचाकी चालकालाच हेल्मेट सक्तीचे होते. गेल्या काही महिन्यांपासून वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही सध्या चिंतेची बाब बनली आहे. याला आळा घालण्यासाठी आता दुचाकीवरील सह प्रवाशालाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.









