एकूण विद्यार्थी संख्या 1157, 38 शाळांत एकच शिक्षक, गेल्या तीन वर्षांत तीन, तर चालू शैक्षणिक वर्षात एक शाळा बंद
प्रसाद तिळवे /सांगे
शिक्षण हे महत्त्वाचे असल्याने प्रत्येकाने शिकले पाहिजे हा हेतू मनात ठेऊन गोव्याचे पाहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी त्याकाळी खेड्यापाड्यात शाळा सुरू केल्या. पण आज विद्यार्थ्यांच्या गळतीमुळे शाळा बंद पडत आहेत. सांगे तालुक्यात 60 सरकारी प्राथमिक शाळा होत्या. पण आता हा आकडा 51 वर आला आहे. येणाऱ्या दोन-तीन वर्षांत हा आकडा आणखी खाली येऊ शकतो. कारण सावर्डे आणि मीराबाग शाळेत प्रयेकी सहा, तर मावळिंगे शाळेत तीन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा आकडा खाली गेल्यास या शाळा भविष्यात बंद होऊ शकतात.
ज्या शाळा पटसंख्या कमी झाल्याने बंद झाल्या आहेत त्यामध्ये साळजिणी, पेरिउदक, मस्कावरे, देवणामळ-काले याचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांत पटसंख्या कमी झाल्याने तीन शाळा बंद पडल्या आहेत, तर चालू शैक्षणिक वर्षात एक शाळा बंद पडली आहे. ग्रामीण भागांतील पालकांचा विद्यार्थ्यांना सरकारी शाळांत पाठविण्याकडे जास्त कल असतो. किरकोळ प्रमाणात पालक आपल्या पाल्यांना इंग्रजीसाठी खासगी शाळांत पाठवितात. सांगे हा ग्रामीण आणि मोठा तालुका असल्यामुळे पालकांना सरकारी शाळांवरच अवलंबून राहावे लागते. रिवण आणि सांगे येथे पालकांना खासगी शाळांचा पर्याय उपलब्ध आहे. सांगे शहरापासून बहुतेक शाळा दूरवर आणि दुर्गम भागांत असल्यामुळे अनेक शिक्षकांना प्रवासी बस पकडून खूप अंतर कापून शाळेत जावे लागते. त्यामुळे उशिरा पोहोचण्याचा प्रसंग येतो. याचा प्रत्यय गेल्या वर्षी वाडे-कुर्डी येथील सरकारी शाळेत आला होता. शिक्षक शाळेत उशिरा पोहोचत असल्याने पालकांनी एक दिवस विद्यार्थ्यांना शिक्षक उशिरा येईपर्यंत न ठेवता घरी पाठविले होते. गेल्या वर्षी दुसरी घटना वालकिणी वसाहत क्र. 1 मधील सरकारी शाळेत घडली होती. तेथील शिक्षकाची बदली झाल्यानंतर दुसरा शिक्षक न आल्याने गावातील एका युवकाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना स्वत: शिकविले होते.
एकल शिक्षक पद्धतीमुळे ताण
शिक्षकांना वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न जरी असला, तरी अनेक क्रियाशील शिक्षक असून ते आपल्या वाहनांतून शाळेत वेळेवर पोहोचतात आणि मुलांना मन लावून शिकवतात, असे भाटीचे माजी सरपंच मनोज पर्येकर यांनी सांगितले. मुळात बहुतेक शाळांत एकच शिक्षक शिकवत असून त्यामुळे शिक्षकावर ताण येतो आणि तो मुलांकडे योग्य लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे या पद्धतीत बदल होण्याची गरज पर्येकर यांनी व्यक्त केली.
पूर्णवेळ भागशिक्षणाधिकाऱ्यांची गरज
भागशिक्षणधिकाऱ्यांनी शाळांना वारंवार भेटी देण्याची गरज आहे. त्यामुळे शिक्षक वेळेवर शाळेत येतात की नाही हे जाणून घेता येईल, असे पर्येकर म्हणाले. सांगे तालुक्यासाठी पूर्णवेळ भागशिक्षणाधिकारी नियुक्त करण्याची मागणी पालकांनी केली आहे. सध्या सांगे भागशिक्षणाधिकारीपदाचा ताबा काणकोण येथील भागशिक्षणाधिकाऱ्यांकडे आहे. ते आठवड्यातून दोन दिवस सांगे कार्यालयात उपलब्ध असतात.
सर्वाधिक विद्यार्थी सांगे सरकारी शाळेत
सध्या 51 सरकारी शाळांपैकी 38 शाळांत केवळ एकच शिक्षक शिकवतात. सर्व 51 शाळांमधून 1157 मुले शिक्षण घेत आहेत. यामध्ये सर्वाधिक 110 विद्यार्थी सरकारी शाळा सांगे येथे आहेत. त्याखालोखाल 80 विद्यार्थी वाडे सरकारी शाळेत, तर सरकारी शाळा काले येथे 67 अशी पटसंख्या आहे. सांगेतील बऱ्याच सरकारी शाळा इमारतींचे नूतनीकरण केले आहे. अजून काही शाळांचे नूतनीकरण होणे बाकी आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असे मत पालक व्यक्त करतात.









