वनखात्याची डोकेदुखी, शेतकऱ्यांमध्ये भीती
बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर आलेल्या चाळोबा गणेश नावाच्या हत्तीचा मुक्काम वाढला आहे. त्यामुळे वनखात्याची झोप उडाली आहे. शिवाय शेतकऱ्यांमध्ये धास्ती कायम आहे. तातडीने या हत्तीला हुसकावून लावावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. डोंगर क्षेत्रातून बाहेर येताच त्याला हुसकावून लावण्यासाठी वनखाते तळ ठोकून आहेत. मात्र हत्ती डोंगराबाहेर येतो की अद्याप किती दिवस मुक्काम करतो याबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. मूळचा आजरा तालुक्याच्या जंगल क्षेत्रातील असलेला हा हत्ती बेळगाव, चंदगड, सीमेवर दाखल झाला आहे. सध्या उचगाव-कोवाड रस्त्यानजीक असलेल्या बेकिनकेरे डोंगरात स्थिरावला आहे. मात्र हा डोंगर कमी क्षेत्राचा असल्याने परिसरातील शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. हत्ती कधीही बाहेर येऊन मानवी वसतीत शिरू शकतो. शिवाय डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात धुमाकूळ घालू शकतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचीही झोप उडाली आहे. रविवारी सकाळपासून हा हत्ती सीमाहद्दीवरील छोट्याशा डोंगरात स्थिरावला आहे. सध्या डोंगरातील पाला आणि काजूच्या बोंडावर गुजराण करू लागला आहे. मात्र पाण्यासाठी त्याला बाहेर पडावे लागणार आहे. बाहेर पडताच वनकर्मचारी त्याला आजऱ्याच्या दिशेने हुसकावणार आहेत. मात्र सध्या परिसरातील शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे.









