डिझेल पंपाचे सोलार पंपात रुपांतर करण्याचे उद्दिष्ट
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात इलेक्ट्रिक वाहने घेण्याचा कल वाढत असून नुकत्याच संपलेल्या 2022 – 23 या आर्थिक वर्षात सुमारे 7000 पेक्षा अधिक वाहनांची खरेदी – विक्री झाल्याचे समोर आले आहे. कदंब परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात 50 पेक्षा अधिक ई-बसगाड्यांना समाविष्ट केले असून सरकारी धोरणानुसार 2030 पर्यंत डिझेल पंपचे सोलर पंपात ऊपांतर करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. ते सोलर पंप 2050 पर्यंत इलेक्ट्रिक ग्रीडशी जोडण्यात येणार आहेत.
वाहतूक खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील रस्त्यांवर 9000 पेक्षा जास्त ई-वाहने धावत असून लोक आता ई-वाहनांकडे वळत असल्याचे समोर येत आहे. वर्ष 2021-22 मध्ये 1443 ई-दुचाकीची खरेदी विक्री झाली होती. त्याच्या तीन पटीने 2022-23 मध्ये सुमारे 6325 ई-दुचाकी वाहनांची खरेदी-विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय
वर्ष 21-22 मध्ये 335 चारचाकी ई-वाहनांची खरेदी-विक्री करण्यात आली होती. ती एका वर्षात वाढून 22-23 मध्ये दुप्पट म्हणजे 684 झाली आहे. बसगाड्यांची संख्या त्या मानाने कमी असून कदंबने मात्र आपली ई-बसगाड्यांची वाहने वाढवण्याचे ठरविले आहे. 21-22 मध्ये एकूण ई-वाहनांची खरेदी-विक्री 1816 होती ती तीन पटीने वाढून एका वर्षात म्हणजे 22-23 मध्ये 7000 वर पोहोचली. ई-वाहनांमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढत असून त्यामानाने तीनचाकी व इतर ई-वाहनांची संख्या मात्र कमी आहे.









