5 वर्षांमध्ये 32 टक्क्यांनी वाढले प्रमाण : सरकारने जारी केले आकडे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात आशियाई सिंहांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकारने रविवारी जागतिक सिंह दिनी 16व्या सिंह गणनेचा अहवाल जारी केला. मागील 5 वर्षांमध्ये देशात आशियाई सिंहांच्या संख्येत 32 टक्क्यांची वाढ झाली आहे, यामुळे देशात आशियाई सिंहांची संख्या वाढून 891 झाली असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे. अहवालानुसार बारदा वाइल्डलाइफ सेंच्युरी, जेतपूर आणि आसपासच्या भागांमध्ये बाबरा जसदान आणि आसपासच्या भागांसमवेत एकूण 9 स्थानांवर आशियाई सिंहांची संख्या 497 आढळून आली आहे. तर पहिल्यांदाच कॉरिडॉर भागात 22 आशियाई सिंह आढळून आले आहेत. उपग्रहाच्या मदतीने ही गणना करण्यात आली आहे.
भारतात आशियाई सिंहांचा अधिवास असल्याबद्दल अत्यंत गर्व आहे. मागील काही वर्षांमध्ये देशात सिंहांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2015 मध्ये 523 सिंह होते, तर 2025 मध्ये ही संख्या वाढून 891 झाली आहे. आम्हाला याप्रकरणी जबरदस्त यश मिळाले आहे. जागतिक सिंह दिनी आम्ही आमच्या सिंहांना वाचविण्याची शपथ घेत आहोत असे केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.
अमरेलीत सर्वाधिक सिंह
मागील एक दशकात देशात सिंहांची संख्या 70 टक्क्यांनी वाढली आहे. गुजरातच्या अमरेलीमध्ये सर्वाधिक आशियाई सिंह आहेत, यातील सुमारे 82 प्रौढ नर आणि 117 प्रौढ सिंहिणी आहेत, तर 79 छाव्यांचा समावेश आहे. मितियाला अभयारण्यात सिंहांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे, त्यानंतर भावनगर मेनलँड आणि दक्षिणपूर्व किनारा भागाचा क्रमांक लागतो. परंतु काही भागांमध्ये सिंहांच्या संख्येत घटही झाली आहे, ज्यात गिरनार अभयारण्य आणि भावनगरचा किनारी भाग सामील आहे.









