मे महिन्यात 28 हजार प्रवाशांचा विमान प्रवास
बेळगाव : उन्हाळी सुट्यांचा कालावधी संपून पावसाला सुरुवात झाल्याने याचा परिणाम विमान प्रवासी संख्येवर झाल्याचे दिसून आले. मे महिन्याच्या अखेरीला सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे मे 2025 मध्ये बेळगाव विमानतळावरून 28 हजार 502 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मागीलवर्षाच्या तुलनेत 11 टक्क्यांनी प्रवासी संख्या घटली आहे. बेळगाव विमानतळावरून सध्या मोजक्याच शहरांना सेवा दिली जात आहे. बेंगळूर, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, जयपूर, अहमदाबाद या शहरांना विमानसेवा सुरू आहे.
अनेक शहरांच्या विमानसेवा तांत्रिक कारण देत कमी करण्यात आल्या. याचा फटका मागील काही महिन्यांपासून विमानतळाला बसला आहे. विशेषत: पुणे, तिरुपती, चेन्नई या शहरांच्या सेवा बंद केल्याने प्रवासी संख्येवर परिणाम झाला. 2024 मध्ये मे महिन्यात 32 हजार 045 प्रवाशांनी विमानप्रवास केला होता. यावर्षी मात्र ही संख्या साडेतीन हजारांनी कमी झाल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. केवळ प्रवासी संख्याच नाही तर कार्गो वाहतूकही कमी झाली आहे. मागीलवर्षी 2.3 मेट्रिक टन कार्गो वाहतूक झाली होती. यावर्षी मात्र केवळ 0.4 मेट्रिक टन कार्गो वाहतुकीची नोंद झाली आहे.
राज्यात बेळगाव चौथ्या स्थानी
मागील अनेक वर्षांपासून बेळगावच्या विमानसेवा हुबळीला नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर यातील काही सेवा हुबळीला नेण्यात आल्या. तरीदेखील प्रवासी संख्येत बेळगाव नेहमीच हुबळीला सरस ठरले. बेंगळूर व मंगळूर या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांनंतर बेळगावमधून सर्वाधिक प्रवासी विमान प्रवास करीत होते. परंतु, सध्या तिसऱ्या स्थानी हुबळी व चौथ्या स्थानी बेळगाव विमानतळ असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
विमानतळांची मे महिन्याची प्रवासी संख्या
विमानतळ प्रवासी संख्या
- बेळगाव 28502
- हुबळी 31348
- कोल्हापूर 15776
- कलबुर्गी 2474
- मंगळूर 161958









