जुलैमध्ये 25 हजार नागरिकांचा प्रवास : गणेशोत्सवात वाढ होण्याची चिन्हे
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत घट होऊ लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जुलै महिन्यात तुलनेने तब्बल 29 टक्के प्रवासी संख्येत घट झाली आहे. प्रवाशांचा ओढा कमी होत असल्याचे लक्षात आल्याने आता तरी विमानतळ प्रशासनाने नव्या शहरांना विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात 25 हजार 943 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. जून महिन्यात 34 हजार 727 प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरून प्रवास केला होता. जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात 8 हजार 784 प्रवाशांची संख्या घटली आहे. ही बाब चिंताजनक असून याचा सर्वच व्यवसायांवर परिणाम होताना दिसत आहे. कोरोनानंतर झपाटय़ाने प्रवासी संख्या वाढत असताना आता मात्र पुन्हा एकदा प्रवासीसंख्या कमी होत आहे.
प्रवासी संख्येसोबतच विमानांची ये-जादेखील कमी होताना दिसून येत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद कमी होत असल्याने विमान कंपन्यांकडून काही फेऱया कमी करण्यात येत आहेत. जुलै महिन्यात 494 विमानांची विमानतळावर ये-जा होती. विमानांच्या वाहतुकीमध्ये 12 टक्क्मयांनी घट झाली आहे. सध्या मान्सूनचा हंगाम असल्यामुळे प्रवासीसंख्या कमी होत असावी, असा अंदाज वर्तविला जात असून गणेशोत्सवापासून प्रवासीसंख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
कार्गो वाहतुकीत मात्र वाढ
एकीकडे प्रवासीसंख्या कमी होत असली तरी दुसरीकडे मात्र कार्गो वाहतुकीत वाढ होत आहे. जुलै महिन्यात कार्गो वाहतुकीमध्ये 29 टक्के वाढ झाली आहे. विमानाने मालाची वाहतूक वाढली असल्यामुळे कार्गो वाहतुकीला बळ मिळाले. या महिन्यात एकूण 8 मेट्रिक टन साहित्याची वाहतूक झाली आहे. त्यामुळे प्रवासीसंख्या कमी झाली असली तरी कार्गो वाहतूक वाढत आहे, ही जमेची बाजू आहे.









