वृत्तसंस्था/मुंबई
देशातील 5जी वापरकर्त्यांची संख्या 2030 पर्यंत तिप्पट होणार असल्याचा अंदाज टेलिकॉम क्षेत्रातील फर्म इरिक्सन यांनी व्यक्त केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफियल इंटेलिजन्स याचा वापर विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत असून हे प्रमाण पाहता 5जी वापरकर्त्यांची संख्या वाढणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे. संस्थेच्या मते 2030 पर्यंत देशभरात 970 दशलक्ष इतके 5जी वापरकर्ते होतील, असे म्हटले आहे. हे प्रमाण एकूण मोबाईल ग्राहकांच्या तुलनेमध्ये पाहता 74 टक्के असेल 2024 अखेरपर्यंत 5जी वापरकर्त्यांची संख्या 270 दशलक्ष इतकी पोहोचू शकते. ही एकूण मोबाईल वापरकर्त्यांच्या तुलनेमध्ये 23 टक्के इतकी आहे. जागतिक पातळीवर पाहता 2024 अखेरपर्यंत 5जी वापरकर्त्यांची संख्या 2.3 अब्ज होईल. एकंदर मोबाईल वापरकर्त्यांच्या तुलनेमध्ये 5जी वापरकर्त्यांचे प्रमाण 25 टक्के वाढलेले असेल. 2030 पर्यंत 5जी वापरकर्त्यांची संख्या 6.3 अब्जांवर पोहोचणार असल्याचा अंदाज इरिक्सनने व्यक्त केला आहे.









